जवाहर शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत विरोधकांकडून सातत्याने खोडा घालण्याचं काम – लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा आरोप

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचा आरोप

◾पंकजाताई मुंडे डायरेक्टर झाल्याने पॅनलबद्दल विश्वास वाढला

◾मतदारांनी अंतर्मुख होऊन विचार करावा; लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनललाच विजयी करण्याचं आवाहन

परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क- शैक्षणिक संस्था हया केवळ राजकारण, निवडणूक आणि जागा भरण्यापुरत्याच राहू नयेत, तर त्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकावीत, तिथला शिक्षणाचा दर्जा उत्तम असावा यासाठी असली पाहिजेत हा विचार करूनच आम्ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडेमी काढली होती तथापि ती अकॅडेमी बंद करण्याचं कारस्थान रचून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत खोडा घालण्याचं काम विरोधकांनी सातत्यानं केलं असा आरोप लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने केला आहे.

जवाहर शिक्षण संस्थेनं अनेक निवडणूका आणि संघर्ष पाहिला. इथलं गढुळ झालेलं वातावरणही सर्वांनी अनुभवलं. अशा परिस्थितीत गोरगरिबांची मुलं शिकणार कुठे? हा प्रश्न होता. केवळ निवडणूका आणि जागा भरणे एवढयासाठीच संस्था नसाव्यात तर वैद्यनाथ काॅलेजमध्ये मुलांबरोबरच मुलींची संख्या देखील वाढावी, स्पर्धा परिक्षेचे केंद्र इथं सुरू व्हावं, देशात चमकणारे तरूण इथून पुढं यावेत यासाठी हे काॅलेज असावं हा शुध्द हेतू मनात ठेवून आम्ही गेली अनेक वर्षे चांगलं काम केलं असल्याचं पॅनलने म्हटलं आहे.

संस्थेनं केवळ शैक्षणिक हित साधलं ; अनेक डेव्हलपमेंट केली
लोकनेते मुंडे साहेबांच्या ताब्यात असल्यापासून ते आतापर्यंत संस्थेनं केवळ विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित साधलं, ज्यामुळे आज इथली अनेक मुलं- मुली वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच विविध क्षेत्रात जाऊ शकली. एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी काॅलेजमध्ये इनडोअर, आऊटडोअर गेम्स, बारा एकरमध्ये प्रदुषणमुक्त जागेवर वाॅकींग ट्रॅक, ज्याचा उपयोग आज विद्यार्थ्यांसह नागरिक देखील घेत आहेत.मुलींसाठी वस्तीगृह, सोलार सिस्टीम, फिल्टर पाणी, जनरेटर, विविध लॅबची डेव्हलपमेंट, अंतर्गत रस्ते, वाॅटर हार्वेस्टिंग, उद्यानाचे नूतनीकरण अशी कितीतरी कामं केली शिवाय शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचं महत्वाचं काम इथं केलं.

पंकजाताई मुंडे डायरेक्टर झाल्यानं पॅनलबद्दलचा विश्वास वाढला
पंकजाताई मुंडे आतापर्यंत संस्थेत संचालक नव्हत्या पण आता त्या स्वतः डायरेक्टर म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांचं वैयक्तिक लक्ष इथं असणार आहे त्यामुळे इथलं शैक्षणिक वातावरण आणखी उंचावणार आहे. आमचा पॅनल सर्व समावेशक असा आहे, पंकजाताईंनी यामध्ये सर्व घटकांना संधी दिली आहे. एखादेवेळेस आमच्यावर मतदारांचा पूर्ण विश्वास नसेलही, अविश्वास असेल पण पंकजाताईवर मतदारांचा पूर्णपणे विश्वास आहे, याऊलट विरोधी पॅनलवर मतदारांचा यत्किंचितही विश्वास नाही. त्यामुळे आमच्या पॅनलचा चेहरा पंकजाताई पर्यायाने मुंडे साहेब आहेत. विरोधी पॅनलला एक चेहरा नाही प्रत्येकाचा स्वतःचा अजेंडा आहे. आणि त्यामुळेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावं असं आवाहन पॅनलच्या उमेदवारांनी केलं आहे.

कसंही करून संस्था ताब्यात घेण्यासाठी कांहींचा आटापिटा
या निवडणुकीत शैक्षणिक प्रगती अथवा चांगल्या गोष्टीविषयी न बोलता केवळ आणि केवळ हे काॅलेज आपल्या हातात कसं येईल यासाठी काही लोकं हातपाय मारत आहेत. त्यांचा हेतू शुध्द नाहीयं, परळीतील प्रत्येक संस्था आपल्या हातात असावी, कसंही करून आपल्याला काहीतरी मिळावं यासाठी संस्थेची बदनामी करून अडचणीत आणण्याचा त्यांचा डाव आहे. ही संस्था विरोधी लोकांच्या ताब्यात गेल्यास ते राजकीय गुंडागर्दीचं केंद्र बनू शकतं त्यामुळे मतदारांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलच्या पाठिशी खंबीरपणे उभं रहावं असं आवाहन पॅनलच्या उमेदवारांनी केलं आहे.