राज्यभरात ७०० पैकी ३१७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू
ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाला मा.केंद्रीय वित्त व अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व मा.आमदार संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती
छत्रपती संभाजी नगर -एम एन सी न्यूज नेटवर्क-राष्ट्रीय आरोग्य अभियान १५ व्या वित्त आयोग अंतर्गत आज दिनांक ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शहरी आरोग्य वर्धिनी (UHWC- Urban Health and Wellness Centre) केंद्राचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पडेगाव येथील ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मा.उप मुख्यमंत्री मा.ना.श्री .देवेंद्र फडणवीस, मा.आरोग्य मंत्री तानाजी सावंत,यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिके तर्फे सावित्रीनगर-चिकलठाणा, राजनगर-मुकुंद नगर, पडेगाव, हर्ष नगर, इटखेडा,सुरेवाडी-हर्सूल, छत्रपती नगर-हर्सूल, न्यू एस टी कॉलोनी, गुरुसाहनी नगर, सातारा परिसर, व्यंकटेश नगर आणि बालाजीनगर असे एकूण १२ ठिकाणी शहरी आरोग्य वर्धिनी (UHWC- Urban Health and Wellness Centre) केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात सावित्रीनगर-चिकलठाणा, राजनगर-मुकुंद नगर, पाडेगाव, हर्ष नगर आणि इटखेडा या ०५ ठिकानी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार आहे.
पडेगाव येथील केंद्राचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. उर्वरित ०४ केंद्र आगामी काळात सुरू करण्यात येणार आहे.या आपला दवाखान्यात सर्व वैद्यकीय सेवा या मोफत असणार आहेत.
सदरील केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी, अटेंडंट आणि सफाई कर्मचारी असे मनुष्यबळ उपलब्ध राहणार आहे.
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा खालील प्रमाणे आहे.
1)बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत)
2) मोफत औषधोपचार
3)मोफत टेलीकन्सल्टेशन
4)गर्भवती मातांची तपासणी 5)लसीकरण
तसेच या केंद्रांमध्ये उपरोक्त सेवांच्या व्यतिरिक्त खालील प्रमाणे सेवा उपलब्ध करून दिल्या जातील ●महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी.
●बाह्य यंत्रणांद्वारे (M/S. HLL) रक्त तपासणीची सोय.
●मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा.
●आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा.
बाह्यरुग्ण विभागातील खालील विशेषतज्ञ संदर्भ सेवा विशेष तज्ञांमार्फत प्रदान करण्यात येईल.
1) भीषक( फिजिशियन)
2) स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ
3) बालरोग तज्ञ
4)नेत्ररोग तज्ञ
5)त्वचारोग तज्ञ
6)मानसोपचार तज्ञ
7)कान-नाक-घसा तज्ञ
दररोज कामावर जाणारे गोर गरीब माणसं,मजूर व महिला मजूर यांना या केंद्राचे लाभ घेता येईल या दृष्टीने सदरील केंद्रांची बाह्यरुग्ण वेळ दुपारी २.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाला मा.केंद्रीय वित्त व अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व मा.आमदार संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मा.अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता ए बी देशमुख,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा,मा.उप संचालक आरोग्य विभाग महानंदा मुंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी शेळके,मनपा उप आयुक्त नंदा गायकवाड,कार्यकारी अभियंता डी बी फड,आरोग्य अधिकारी, कर्मचारी ,नागरिक यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री,मा.उप मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री महोदयांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
पडेगाव आरोग्य केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमावेळी डॉ.पारस मंडलेचा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपला दवाखाना ची विस्तृत माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना मा.केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी डॉ.पारस मंडलेचा यांच्या कामाचे विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच मा.आमदार संजय शिरसाट यांनीही डॉ मंडलेचा यांच्या कामाचा गौरव केला व उपास्थित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. डॉ कराड यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या आपला दवाखाना च्या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपास्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे उद्घाटन करण्यात आले.काल पहिल्या दिवशी एकूण ७० रुग्णांची तपासणी करण्यात आली.११ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. दुपारी ०२.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत हा दवाखाना सुरू असणार आहे.या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.