चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी शेकडो हात पुढे

परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क – येथील सहा वर्षीय बालक वेदांत गणेश जोशी या चिमुकल्याला विल्सन डिसिज या ३० हजारांमधून एकाला होणाऱ्या आजाराचे निदान झाले. त्यावर उपाय लिव्हर (यकृत) प्रत्यारोपण हाच असून त्यासाठी 25 लाखांचा खर्च पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितला आहे. सर्व साधारण परिस्थितीतील जोशी कुटुंबीयांना मदतीसाठी शेकडो हात पुढे आले आहेत. दोन दिवसात जमा झालेली रक्कम जोशी कुटुंबीयांचे मनोबल वाढवणारी असली तरी आणखीही समाजातील सर्वच घटकातील संवेदनशील, दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन वेदांतच्या उपचारासाठी काम करणाऱ्या चळवळीतील मान्यवरांकडून केले जात आहे.
येथील अंबेवेस भागातील धरणीधरवाड्यातील जोशी कुटुंबीयांच्या घरातील चिमुकला वेदांत याला कावीळ झाल्याचे निमित्त झाले. मात्र अंग अधिक पिवळे दिसू लागल्यानंतर वैद्यकीय चाचणी करून घेतली. त्यामध्ये वेदांतला विल्सन डिसीज हा आजार असल्याचे निदान झाले. या आजारामध्ये मेंदू, डोळे आणि लिव्हरमध्ये शरीरात तयार होणारे तांबे उतरत असते. वेदांतबाबत तांबे उतरण्याची प्रक्रिया लिव्हरपासून सुरुवात झाली. त्यामुळे त्यावर लिव्हर प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असून त्यासाठी 25 लाख रुपये खर्च असल्याची माहिती डॉक्टरांनी वेदांतच्या पालकांना दिली.

प्रत्यारोपणासाठी लिव्हर डोनरचा शोध आणि खर्चाची मोठी रक्कम गोळा करणे व तेही आठवड्याच्या आत, असे दुहेरी संकट वेदांतच्या कुटुंबीयांसमोर उभे राहिले. सुदैवाने यातील एक संकट दूर झाले. वेदांतसाठी लिव्हर डोनर मिळाला. मात्र 25 लाख जमा करण्यासारखे अग्निदिव्य वेदांतच्या पालकांना करावे लागणार होते. वेदांतचे वडील गणेश जोशी हे परळीतच अकाऊंटंट म्हणून जेमतेम पगारावर काम करतात. त्यातूनच घर चालवण्यात येत असल्यामुळे मोठी गंगाजळी गाठीशी नाही. त्यांच्या या परिस्थितीची माहिती निकटवर्तीय, मित्र परिवाराकडून गल्लीपासून सर्वच घटकांपर्यंत समाज माध्यमातून जाण्यास सुरुवात झाली आणि मदतीसाठी आवाहन करण्यात आले. त्याला दोनच दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला. शेकडो संवेदनशील आणि दानशूर व्यक्तींकडून जात, पंथ अगदी धर्माचाही विचार न करता मदतीसाठी हात पुढे आला. त्यामुळे वेदांतच्या पालकांचे मनोबल उंचावले. मात्र वेदांतसाठी बऱ्यापैकी ही रक्कम जमा झालेली असली तरी
आणखी शेकडो हात मदतीसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

संवेदनशीलतेचे दर्शन
वेदांतवरील लिव्हर प्रत्यारोपणासाठी 25 लाखांचा खर्च आहे. सुदैवाने वेदांतला डोनर मिळाला आहे. उपचार खर्चासाठी दोन दिवसात सर्वच घटकातील शेकडो संवेदनशील, दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र जेवढी जमा झाली आणखी तेवढ्याच रकमेची आवश्यकता आहे. अनेकांपर्यंत अजूनही वेदांतबाबतची माहिती पोहोचली नाही. दातृत्वाची परीक्षा देण्याची खरी वेळ आता आलेली आहे, या न्यायाने निश्चित अनेक संवेदनशील, दानशूर व्यक्ती पुढे येतील, हा विश्वास वाटतो.मदतीसाठी गुगल पे आणि फोन पे नंबर गणेश जोशी +919730065592
–बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष, परळी.