सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर  दि : २० : सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोईसर (जि. पालघर ) येथील आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी वधू वरांना शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली.यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा कार्यक्रमाला प्रत्येकाने आवर्जून वेळ काढून जायला हवे. अशा सोहळ्यातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील वधू-वरांचा विवाह होतो ही आनंददायी बाब आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामुदायिक विवाह सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. कर्ज काढून लग्नसोहळे केल्याने पालकांच्या मागे चिंता लागतात. असा खर्च टाळता यावा यासाठी असे सामुदायिक विवाहसोहळे गरजेचे असून  ही समाज व काळाची गरज आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, शेतकरी सन्मान योजनेतून केंद्राचे ६ हजार रुपये व राज्य सरकारचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकरी बांधवांना  देण्यात येतात.या भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. बांद्रा वर्सोवा ब्रिज विरारपर्यंत आणला जाईल. कामगारांसाठी १५० बेडचे ईएसआय हॉस्पिटल अंतिम टप्प्यात आहे. विरारपासून कोस्टल हायवे ॲक्सेस कंट्रोल थेट पालघरपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएद्वारे आवश्यक प्रकल्प या परिसरात राबवले जातील जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

Team DGIPR in वृत्त विशेषsliderTickerजिल्हा वार्तापालघर