नवी दिल्ली, 23 मे – नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तसेच या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या उमेदवारांना त्यांनी सल्लाही दिला आहे.
पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्विट केले आहे :
“ज्यांनी आज नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, अशा सर्व युवांचे अभिनंदन. त्यांच्या यशस्वी आणि समाधानकारक करियरसाठी माझ्या अनेक शुभेच्छा ! देशाची सेवा करण्याची आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळणे हा आपल्या आयुष्यातील अत्यंत रोमांचक क्षण असतो. “
“ज्यांना या प्रयत्नांत ही परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही, त्यांची निराशा मी समजू शकतो, मात्र, आणखी प्रयत्न तुमची वाट बघत आहेत, त्याशिवाय, तुमची कौशल्ये आणि बलस्थाने यांचा उपयोग करण्यासाठीच्या अनेक संधी आज भारतात उपलब्ध आहेत. तुम्हा सर्वांनाही अनेक शुभेच्छा !”