जिल्हाधिकारी कार्यालय आणि चाईल्ड लाईन बीडच्या सतर्कतेमुळे कारवाई.
परळी -एम एन सी न्यूज नेटवर्क:- तालुक्यातील कन्हेरवाडी आणि डाबी या दोन ठिकाणी अल्पवयीन बालिकेचे बाल विवाह आयोजित करण्यात आली होते. या बाल विवाहाची गुप्त माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळताच युवा ग्राम अंतर्गत चालत असलेल्या चाईल्ड लाईन बीड सदस्य यांनी पुढील कारवाई करून हे बाल विवाह थांबविण्यात आले.
दोन्ही गावातील बाल विवाह रोखल्यानंतर संबधित कुटुंबातील सर्व सदस्यांचे समुपदेशन करण्यात आले. मुलीचे अल्प वयात बाल विवाह केल्यास होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी डाबी येथील पालकांनी आमच्या मोठ्या मुलीच्या लग्नात आम्ही लहान मुलीचे पण लग्न आयोजित केले होते. परंतु आम्हाला आत्ता बाल विवाहाबाबत समुपदेशन मिळाल्यामुळे आम्ही आमच्या मुलीचे लग्न थांबवीत आहोत. व तिचे वय १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नसल्याबाबतची तयारी दर्शवली. ही कारवाई गट विकास अधिकारी श्री संजय नारायण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती बी यु. रोडे, पर्वेवेक्षिका – एस डी देशमुख, दोन्ही गावातील अंगणवाडी सेविका, अशा वर्कर व चाईल्ड लाईन बीड सदस्य संतोष रेपे यांनी केली.
◾ जिल्ह्यात बाल विवाहास सहकार्य करणाऱ्या संबधित व्यक्तीवर तत्काळ गुन्हे नोंद करा. अल्पवयीन मुलींचा साखर पुडा करणे हा सुद्धा गुन्हाच आहे. याची सतर्कतेने दखल घ्यावी-
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
◾आपण लग्न चोरून,गुपचूप, जिल्ह्याच्या बाहेर जाऊन, एखाद्या मंदिरावर जाऊन केले म्हणजे आपण कायद्यातून सुटलो असे नाही. याची गांभीर्याने नोंद घ्यावी. जर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यास २ वर्षापर्यंत बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ अन्वये कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊ शकतो. –
एच पी देशमुख
– संचालक चाईल्ड लाईन बीड