समर्थ प्रतिष्ठानच्या सामुदायिक सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार

बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांची उपस्थिती

परळी वैद्यनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क- – वेदनिष्ठ धर्मशील व्यक्ती,समाज व राष्ट्र निर्मितीसाठी सोळा संस्कारांत उपनयन संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यासाठी केवळ खऱ्या अर्थाने उपनयन संस्कारानंतर अध्ययन,गायत्रीमंत्र पठण व अन्य संस्कारमूल्य जपले गेले पाहिजेत असे प्रतिपादन वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी केले.शहरात समर्थ प्रतिष्ठान द्वारे सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरूवार दि.२५ रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर यंदाच्या सोहळ्यात २२ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. श्री वैद्यनाथ दर्शन मंडपात या उपनयनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थीती होती.या उपनयनाचे पौरोहित्य पं.विजय पाठक यांनी केले.संत महंतांची आशिर्वादपर उपस्थिती होती. सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

पुढे बोलतांना वे.शा.सं. ज्योतिषाचार्य अनंतशास्त्री जोशी यांनी सांगितले की, धर्माचरणाचे संस्कार हे उपनयना सारख्या संस्कारातून होतात. त्यामुळे आपले सोळा संस्कार हे धर्मसंमत आहेत. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात.त्यामुळे केवळ व्रतबंध करुन सोपस्कार पार न पाडता उपनयन संस्कारानंतरचे आचरण व संस्कारमूल्य जपण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.