यंदातरी गजानन महाराज पालखीचा मार्ग परळीच्या जुन्या गावभागातून पुर्ववत ठेवावा – बाजीराव भैय्या धर्माधिकारी

संस्थांनकडे गतवर्षीपासून केलेली मागणी

परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क– राज्यभरातील भक्तांचे  श्रध्दास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा पंढरपूर आषाढी वारी निमित्त निघणारा पालखी सोहळा दरवर्षी परळीत येतो. या दोन दिवसात परळीचे वातावरण अतिशय भक्तीमय असते.परंतु या भक्तीत भेद निर्माण करण्याचे काम गेल्यावर्षीपासून सुरु झाले संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग गेल्यावर्षीपासून बदलला. याबाबत पालखी मार्ग पुर्ववत राहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. संस्थांनकडे गतवर्षीपासून मागणी केलेली आहे. त्यामुळे निदान यंदातरी गजानन महाराज पालखीचा मार्ग परळीच्या जुन्या गावभागातून पुर्ववत ठेवा अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केली आहे.

परळीत येणाऱ्या सर्वच दिंड्या नगरप्रदक्षिणा करूनच मार्गस्थ होतात. अन्यत्र वारीमार्गावर कोणत्याच ठिकाणी नगरप्रदक्षिणा केली जात नाही.परळी व त्यानंतर पंढरपूर याठिकाणी दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात. एवढी धार्मिक व जाज्वल्य परंपरा मोडीत निघत आहे.त्यामुळे आपलं शहर -आपली परंपरा जपण्यासाठी गेल्यावर्षीपासून प्रयत्न केले. याबाबत राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचेही संस्थानशी बोलणे झालेले आहे. संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग पुर्ववत राहण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात आले.मात्र गतवर्षी संस्थानने नियोजन झाले असुन सहकार्य करण्याची विनंती केली होती.संत गजानन महाराज संस्थानला याविषयी सविस्तर भुमिका व आग्रही मागणी करण्यात आलेली आहे.राणी लक्ष्मीबाई टॉवर- गणेश पार रोड -गणेशपार- नांदूरवेस- मार्गे नेहरू चौक- संत जगमित्र नागा मंदिर अशा प्रकारची नगरप्रदक्षिणा करून हा पालखी सोहळा मार्गक्रमण करतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही धार्मिक परंपरा बनलेली आहे. दरवर्षी संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे परळी शहरात जोरदार स्वागत होते.  हीच परंपरा यावर्षीपासून पुर्ववत कायम राहण्यासाठी भाविक भक्तांसह सर्वांनी आत्तापासून प्रयत्न करावे असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आरंभ आज शेगाव येथून झाला.शक्तिकुंज वसाहत थर्मल येथे सोमवार दिनांक १२ जून रोजी आगमन होत असून परळी वैद्यनाथ नगर प्रदक्षिणा मंगळवार दिनांक १३ जून सकाळी संपन्न होवून संत जगमित्र मंदिर येथे मुक्काम होवून दुसऱ्या दिवशी कन्हेरवाडी मार्गे अंबेजोगाई मार्गस्थ होईल.परळीमधील काही मोजक्या लोकांचा शेगाव देवस्थान विश्वस्त मंडळ आणि प्रशासनावर पगडा आहे हे गेल्यावर्षी अनुभवले. अनंत आर्जव करून सुध्दा आमचे ऐकले गेले नाही.निदान यावर्षी पासून पूर्ववत पालखी मार्ग असावा ही जनभावना आहे. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करु या असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

 

फोटो साभार -ABP माझा.