बीड, एम एन सी न्यूज नेटवर्क दि. २६:-गाळयुक्त शिवार मोहीम अंतर्गत बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्यात येऊन शेतकऱ्यांच्या शेतात नेला जावा. तसेच धरण, तलाव व बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी शेतकरी, लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गाळ काढण्याची कामे पूर्ण करुन शेतकऱ्यांच्या कार्यवाही करण्यात यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील विविध जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासाठी प्रगती सभागृहात बैठक संपन्न झाली, याप्रसंगी त्या बोलत होत्या. बैठकीसाठी प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा माजलगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदित्य जीवने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपजिल्हाधिकारी डॉ.दयानंद जगताप, उपविभागीय अधिकारी प्रमोद काळे , नीलम बाफना, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अजित परांडे, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रोहन पवार, डॉ बी. डी. बिक्कड यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ -मुंडे म्हणाल्या, राज्याने यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेत चांगले काम केल्याने सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन जलसंधारण कामे वेगाने करण्याच्या दृष्टीने सुचना केल्या आहेत. बीड जिल्ह्यात देखील गाळ मुक्त धरण व जलयुक्त शिवार -२ , जलशक्ती अभियान राबवण्यात येत आहे, तसेच शासकीय कार्यालयांच्या इमारती असलेल्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे येत्या महिन्यात प्राधान्याने करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले, गाळ मुक्त धरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून व शेतकरी सहभागातून गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात नेला जावा. यासाठी अनुदान निश्चित केले आहे. शासन निर्णयानुसार अल्पभूधारक व प्राधान्यक्रमा नुसार शेतकऱ्यांना संबंधित प्रकल्पातील गाळ उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी नोंदणी व कामाची प्रक्रिया स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येईल. तंत्रज्ञानाचा वापर करत यासाठी ‘अवनी’ ॲप तयार करण्यात आले आहे. याचे प्रशिक्षण निवड झालेल्या स्वयंसेवी संस्थातील निर्देशित व्यक्तींना दिले जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
याप्रसंगी ‘अवनी’ॲप च्या बाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच जलयुक्त शिवार योजना-२ च्या अंतर्गत कामांच्या नियोजनासाठी संबंधित गावांचे नकाशे एमआर सॅट च्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत त्यामध्ये पाण्याचे प्रवाह, तसेच नालाबांध , कॅचमेंट एरिया आदी बाबतचे तपशील देण्यात आले आहेत. याची माहिती सादर करण्यात आली. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिवार फेरी घेऊन पुढील मान्यतांबाबत कार्यवाही करण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या.