जल पुनर्भरण ही लोक चळवळ व्हावी ही भावना- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

◾ परळीतील डॉक्टर व व्यापाऱ्यांशी साधला संवाद

परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क – जलपुनर्भरण ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे. परळी शहर व तालुक्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जल पुनर्भरण करावे. जेणेकरून पाण्याची कसलीही टंचाई जाणवणार नाही. तसेच जल पुनर्भरण मोहिमेसाठी परळीतील डॉक्टरांनी जनजागृती करावी. आपल्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना जल पुनर्भरण योजनेबाबत सांगावे असे विनंती वजा आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी परळी येथे डॉक्टर व हॉटेल व्यवसायिक यांच्याशी संवाद साधताना नगर परिषदेच्या सभागृहात केले.

या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, कार्यालयीन सचिव संतोष रोडे, अभियंता वामन जाधव, पाणीपुरवठा अभियंता प्रफुल्ल साळवे आदिची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या प्रसंगी जल पुनर्भरणाचे महत्त्व विशद करताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे म्हणाल्या की, परळीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाई जाणू नये तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे. यातूनच भूगर्भातील पाणी पातळी वाढली पाहिजे. यासाठी शहरातील विशेषतः डॉक्टरांनी सामाजिक जाणीव, एक वेगळा चांगला उपक्रम समाजासाठी राबवला पाहिजे म्हणून डॉ.मंडळींनी अधिक प्रयत्न करावेत.विविध माध्यमातून डॉ. मंडळींनी पुढे यावें आपल्या रुग्णालयात येणाऱ्या अनेक रुग्णांना आपण केलेल्या जल पुनर्भरण योजने संदर्भात माहिती द्यावी असेही त्या म्हणाल्या. व्यावसायिकांनी आपल्या कुपनलिका घरांचे घराचे छत, घरातील आड, विहीरींचे जल पुनर्रभरण करुन घ्यावे. तसेच इतरांनाही या मोहिमेसाठी प्रवर्त करावे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक जलपुनर्भरण करतील. परळी शहरात येणार्या काळात पाऊस कमी झाला तरी जमीनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण अत्यंत महत्वाचं आहे. जलपुनर्भरण होत नसल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणे म्हणजे एका प्रकारे दुष्काळात निमंत्रणच म्हणावे लागेल.

ही परिस्थिती परळी शहरात निर्माण होऊ नये म्हणून रेनवॉटर हॉर्वेस्टिंग या माध्यमातून जनजागृती करून इमारती, घरांच्या छतावर चे पाणी एकत्र साठवून शोष खड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवायला पाहिजे. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास जलपुनर्भरण म्हणून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रयोग मोठ्या प्रमाणवर अमलात आणण्यासाठी विशेषता डॉक्टरांनी व व्यावसायिकांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले.