परळी एम एन सी न्यूज नेटवर्क- वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीतून आपण घेतलेली माघार ही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली आहे. मी निवडणूक लढवावी असे अनेकांना वाटत होते परंतु भविष्यात ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जावे यासाठी आपण आपले उमेदवारी अर्ज परत घेत असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले.
वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीतील आपला उमेदवारी अर्ज आज अखेरच्या दिवशी फुलचंद कराड यांनी परत घेतला. या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज परत घेतल्याचे जाहीर केले. वैद्यनाथ कारखाना गोपीनाथराव मुंडे यांचे सहकार क्षेत्रातील मोठे स्वप्न होते. माझ्यासह अनेकांनी नेहमीच कारखानाच्या हिताला प्राधान्य देत या भागातील ऊस उत्पादक शेतकरी कसा मोठा होईल याकडे लक्ष दिल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले. या दृष्टीकोनातूनच उमेदवारी अर्ज परत घेत असल्याचे ते म्हणाले. मी माघार घेतली याचा अर्थ त्यांना पाठिंबा असे मुळीच नाही परंतु शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य न दिल्यास मी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विरोधात लढा देण्यासाठी पुढेच असेल असेही ते म्हणाले . यावेळी तुमच्या सर्वांचे ऐकूनच माघार घेतोय याचा अर्थ पुढील सर्व निवडणुकीत तुम्हाला मोकळी मैदान देईल असे समजायचे कारण नाही असा इशाराही फुलचंद कराड यांनी दिला. उमेदवारी अर्ज परत घेताना मनाला खूप वेदना झाल्या, परंतु मुंडे साहेबांची पुण्यतिथी लक्षात घेता त्यांना अर्ज परत घेऊन आपण श्रद्धांजली देत असल्याचे फुलचंद कराड म्हणाले.
