गुंतवणूकदारांची फसवणूक

◼️ सुमारें १ कोटी २० लाख रुपयांनी फसवणूक दि. विदर्भ अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटीचा घोटाळा

नागपूर : आकर्षक व्याज, लाभांश, फायदा स्वरूपातील आमिष दाखवून  गुंतवणूकदारांची १ कोटी २० लाखांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने दि. विदर्भ अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दि. विदर्भ अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी या सहकारी संस्थेच्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. सोसायटीचे अध्यक्ष उमेश रूपचंद मेंढे यांच्यासह संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना आकर्षक व्याज, लाभांश, फायदा देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडलेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी त्यांची जन्माची जमापुंजी सोसायटीत गुंतविली; पण जुलै २०१५ पासून ते सप्टेंबर २०१९ यादरम्यान मुदत संपल्यानंतर व्याज, लाभांश, फायदा याच्या स्वरूपातील किंवा कोणत्याही अन्य स्वरूपातील लाभांश व ठेवीची परतफेड केली नाही.शहरातील शाखा बंद केल्या आहेत.

दरम्यान संस्थेने आपली रक्कम परत न केलेल्या आणि गुंतवणूक अडकलेल्या गुंतवणूकदारांनी संबंधित कागदपत्रासह आर्थिक गुन्हाशाखेचे पोलीस उपयुक्त अमोल देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.