बॅग हिसकावून लुटले चार लाख 90 हजार

परळी एम.एन एस न्यूज नेटवर्क- परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बळजबरीने बॅग हिसकावण्याचा प्रकार घडला असून यासंदर्भात परळी शहर पोलीस ठाण्यात चार लाख 90 हजार 860 रुपये पळविल्या प्रकरणी अज्ञात 3 चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अत्यंत सिनेस्टाईल घडलेल्या या वाटमारीमुळे परळी शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत परळी शहर पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, रमेश ज्ञानोबा पाचणकर (वय 58) व्यवसाय मजुरी रा. कडबा मार्केट परळी वैजनाथ हे बस स्थानक ते कराड हॉस्पिटल च्या दरम्यान चालत जात असताना अज्ञात तीन इसमांनी पांढऱ्या रंगाच्या स्कूटर वर दि.6 जून 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान येऊन त्यांच्या हातातील पैशाने भरलेली बॅग सिनेस्टाईल हिसकावून घेऊन पोबारा केला. सदरील बॅगेत 4 लाख 90 हजार 860 रुपये असा मुद्देमाल होता.

दरम्यान सदरील पैशाने भरलेली बॅग ही एका व्यापाऱ्याच्या वसुलीचे पैसे असल्याचे समजते. घडलेला प्रकार समजताच अंबाजोगाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले व परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांता गोसावी यांच्यासह परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तीन अज्ञात आरोपी फरार असून फिर्यादी रमेश ज्ञानोबा पाचणकर यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपीविरुद्ध गुरनं 116/2023 कलम 392, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपासणी सपोनि भार्गव सपकाळ हे करीत आहेत.