बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी सीईटीच्या निकालाकडे

एमएच सीईटी परीक्षेचा निकाल उद्या सोमवारी दि. १२) जाहीर केला जाणार, अभियांत्रिकीच्या, फार्मसी,  ९८९८ जागा

नाशिक- एम एन सी न्यूज नेटवर्क- : बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी सीईटीच्या निकालाकडे लागले आहे. इंजिनिअरिंग व फार्मसी या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या एमएच सीईटी परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी (दि. १२) जाहीर केला जाणार आहे. नाशिकमध्ये फार्मसी व आभियांत्रिकीच्या ९८९८ जागा असून, एकूण परीक्षार्थी ४०७४० होते. पीसीएम ग्रुपसाठी २० हजार ९१७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर पाहता येईल.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १४ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाते. प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी अनिवार्य असते. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक ६ लाख ३६ हजारांहून अधिक विद्यार्थी अभियांत्रिकी व फार्मसीच्या सीईटीला प्रविष्ठ झाले होते. नाशिकमध्ये ११ केंद्रांवर सीईटी दोन ग्रुपमध्ये घेण्यात आली होती. ११ केंद्रांवर ९ ते १४ मे या दरम्यान पीसीएम ग्रुपसाठी, तर पीसीबी ग्रुपची परीक्षा १५ ते २० मे दरम्यान ऑनलाइन पद्धतीने सीईटी परीक्षा घेण्यात आली.

सीईटीच्या निकालानंतर अभियांत्रिकी, कृषी व फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. कॅप राउंडचे महाविद्यालयांत सुविधा केंद्र (एफसी) सुरू होणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनसह वेळापत्रकही लगेच जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व इतरही प्रक्रिया कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण करणे आवश्यक आहे.