प्रवाशांना सुविधा पुरवा, त्यांचे हाल थांबवा अन्यथा आंदोलन — अँड.मनोज संकाये

परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क-  बारा ज्योतिर्लिंगापैकी परळीचे पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून देशभरात ओळखले जाणारे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. या शहराचे पावन आणि पवित्र भूमी म्हणून ओळख आहे. शहरात मध्यवर्ती भागात असलेले परळीचे बस स्थानक हे सुविधा शून्य आणि विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे, या बस स्थानक आगारांमध्ये कोणत्याही सुविधा प्रवासासाठी उपलब्ध नाहीत. परळी आगाराचे महिन्याला चांगले उत्पन्न असून सुद्धा प्रवाशांना सुविधा का नाहीत असा सवाल करत प्रवाशांच्या सुविधेसह आगाराची स्वच्छता करावी प्रवाशांना सुविधा पुरवा त्यांची हालअपेष्टा थांबवा अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा अँड.मनोज संकाये यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन शहरात झाले आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला हलक्या पावसातच परळी बस स्थानकासमोर खड्ड्यात पाणी साचलेले दिसून आले, तसेच स्थानकात असलेले उपहारगृह (कॅन्टीन) च्या पाठीमागे घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरलेली आहे.

परळी बस स्थानकात वाहने उभी करण्यासाठी असलेल्या जागेभोवती असंख्य खड्डे पाहिला मिळतात तसेच बसस्थानकात प्रवाशांसाठी असलेले निवारे हे मोडकळीस आले आहेत. पावसाळ्यात नागरिकांना थांबण्यासाठी हे निवारे करण्यात आले आहेत परंतु त्याच्या दुरुस्तीकडे आगार प्रमुखांचे आणि अधिकारी वर्गांचे दुर्लक्ष झाले आहे. लाल परी प्रवाशांना घेऊन प्रवास करते परंतु त्याच प्रवाशांना तालुक्याचे ठिकाण असलेल्या बसस्थानकात साधी बसण्याची आणि उभी राहण्याची व्यवस्था सुद्धा नसणे ही दुर्दैवी बाब आहे.  प्रवाशांना सुविधा देण्याऐवजी त्यांचीच गळचेपी आणि हाल होत आहेत.

प्रवाशांच्या सोयीकरिता बांधण्यात आलेल्या स्वच्छता ग्रहात अतिशय घाण आहे.  या अगोदर मित्र मंडळाच्या वतीने खड्ड्यांमध्ये बेशरम लागवड करून परळी बस स्थानकाचा निषेध नोंदवणारे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आंदोलन केले परंतु आगार प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे प्रवाशांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही महामंडळ आणि आगारांची आहे, ती त्यांनी पार पाडावी अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन आगारात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.