बेलवाडीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण उत्साहात.

सोलापूर- बेलवाडी – एम एन सी न्यूज नेटवर्क -जयघोष अन् चौखूर उधळत रिंगणात धावणारे अश्व अशा भारावून टाकणाऱ्या उत्साही वातारणात बेलवाडी येथे मंगळवारी (दि. २०) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पार पडले .

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि. २०) सकाळी सणसर येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोषात निघालेल्या सोहळा बेलवाडीत दाखल होताच वारकऱ्यांना सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणाची आस लागली होती. रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. नऊ वाजण्याच्या दरम्यान टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर निनादला होता.

संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे, सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, प्रल्हाद मोरे, विश्वजीत मोरे, रामभाऊ मोरे यांनी रिंगणाची पाहणी केली. पेठ बाभूळगावकरांच्या मानाच्या अश्व व अकलूज च्या डॉ. धवलसिंह मोहिते यांच्याकडील स्वारांच्या अश्व रिंगणात दाखल झाले. वारकऱ्यांनी ज्ञानबा, तुकारामाचा जयजयकार सुरु केला. मृदंगावर थाप, टाळ मृदंगाचा गजरात मानाचा अश्व अन् स्वारांच्या अश्व यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला.

पालखीच्या ठिकाणी अश्वानी तीन फेऱ्या घेतल्या, दरम्यान रिंगण स्थळावर वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिला युवतीच्या फुगड्या, भजन आणि विठू नामाचा जयघोषाने वातावरण प्रसन्न होते.

प्रतिकात्मक छायाचित्र: