तू तू मी मी…नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
परळी-वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क- परळीत आज होत असलेला नाट्यप्रयोग, त्याला.मिळत असलेला प्रतिसाद अभूतपुर्व असाच आहे. चांगल्या रसिकांसमोर आमची कला सादर करतांना आम्हाला आनंद होत असून परळी येथे नाट्य संस्कृती रुजविण्यासाठी चंदुलाल बियाणी यांचे प्रयत्न कौतुकास्पद असून परळीत नाट्य संस्कृती अधिक वृद्धींगत व्हावी यासाठी आपण मनापासून सहकार्य करु, असा शब्द प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी दिला.
संसारात पती-पत्नीमधील होणारा वाद तू तू मी मी…नाटकातून अतिशय समर्पक पद्धतीने मांडण्यात आला आहे. तू तू मी मी…करण्यापेक्षा संसार टिकावा यासाठी प्रत्येकाना वाद-विवादापासून दूर रहावे असा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे. हास्य विनोद तर कधी समाज सुधारणेसाठी व्यक्त करण्यात आलेले संदेश हे या नाटकाचे वैशिष्ट्ये होते. अभिनेते कमलाकर सातपुते, निखील सावंत, रुचिरा जाधव, ऐश्वर्या शिंदे आणि वेगवेगळ्या 14 भुमिकेत असलेले अभिनेते भरत जाधव यांच्या बहुरंगी अभिनयाने हा नाट्य प्रयोग चांगलाच रंगला होता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर येथे या नाट्य प्रयोगासाठी परळीतील हौशी नाट्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान अभिनेते भरत जाधव यांचा परळी शहर ठाण्याचे प्रभारी पो.नि. चंद्रकांत गोसावी,मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, कमलाकर सातपुते यांचा ओमप्रकाश बुरांडे, धनंजय आरबुने, निखील सावंत यांचा संपादक सतिश बियाणी, अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे यांचा डॉ. रंजना घुगे व सौ. कल्पना बियाणी तर गौरी फणसे यांचा ज्येष्ठ नेत्या सौ. सुदामती गुट्टे व सौ. भारती बियाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी यांना नुकताच वैद्यनाथ रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या पार्श्वभूमीवर अभिनेते भरत जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. नीट परीक्षेत राज्यातून द्वितीय व मराठवाड्यातून प्रथम आलेल्या पलक श्रीकांत जाजू, पार्थ बालासाहेब कराड, आरुषी रांदड, आरती पोरवाल, प्रणव अजय मुंडे यांचा अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अडीच तास चाललेल्या या नाट्यप्रयोगात रसिक प्रेक्षकांनी केलेली गर्दी भविष्यात नाट्य संस्कृती वाढविण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास निर्माण झाला आहे.
नाट्य प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा साथी, राजस्थानी मल्टीस्टेट, बंसल क्लासेसच्या परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.