बावन वर्षांनंतर ५२ वर्गमित्रांची भेट; स्नेहमीलन उत्साहात
परळी- एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये १९७२ ते १९७४ या वर्षांमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा “आम्ही शाळकरी” या शीर्षकाखाली आयोजित केलेला स्नेहमेलन सोहळा रविवारी (दि.२५ जून) उत्साहात संपन्न झाला. येथील आर्य वैश्य कार्यालयात घेण्यात आलेल्या सोहळ्याला भावनिक कल्लोळाची किनार लाभली होती. सुमारे 52 वर्षानंतर ५२ भेट आणि परस्परांना आलिंगन देण्याचा मैत्रभेटीचा अपूर्व योग साधला होता.
डॉ. श्रीपाद बुरकुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे आदी माजी विद्यार्थ्यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. वैजनाथ सुत्रावे, गोविंद कौलवार, वाल्मीक भालेराव, अरुण जैस्वाल, दिवाकर धोंड, व्यंकट पारशेवार आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलनाची सुरुवात सकाळी वैद्यनाथ प्रभु दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर शालेय स्तरावरील आठवणींना जागवताना आर्य वैश्य कार्यालयापासून आपल्या शाळेपर्यंत प्रभात फेरी काढली. शाळेमध्ये राष्ट्रगीत गान करून प्रतिज्ञा म्हटली. शाळेतील विद्यमान शिक्षकांनी या माजी विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत केले. माजी विद्यार्थी दिवाकर धोंड, बालासाहेब शास्त्री यांनी शाळेतील वर्गावर जाऊन तास घेतले. यावेळी हयात असलेले शालेय स्तरावरील त्या काळाचे शिक्षक अनवर सर व दळवी सर यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात स्नेहसंमेलनाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. येथे श्री तोंडारे सर श्री दळवी सर, श्री बोंदार्डे सर व अनवर सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या चारही शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आजच्या शैक्षणिक परिस्थितीवर भाष्यही केले.
माजी विद्यार्थी डॉ. श्रीपाद बुरकुले व प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांचा त्यांनी त्यांच्या जीवनातील कारकिर्दीत दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचाही स्मृतिचिन्ह, दोन पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. या दोन पुस्तकांमध्ये आकाशवाणीवरील निवेदक अनंत काळे यांच्यावरील स्मृतिग्रंथ व डॉ. जब्दे लिखित नॅक यंत्रणेवरील इंग्रजी पुस्तकाचा समावेश होता. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने व्यासपीठावर येऊन आपला परिचय आपली स्वतःची कौटुंबिक, व्यावसायिक कामकाजाची माहिती दिली. नंतर आपापल्या गुणवैशिष्ट्यांनी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी येथे कला सादर केली. पसायदानाने सांगता झाल्यानंतर निरोप घेताना मात्र वातावरण कमालीचे भावनिक झाले होते. 52 वर्षानंतर 52 वर्गमित्र एकत्र आल्याच्या आठवणींची शिदोरी घेऊन आपापल्या गावी, घरी परतले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला कविता नकला गाण्यांचे कार्यक्रमांनी रंगत आणली.