आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वैद्यनाथ मंदिर गर्दीने फुलले
शहरातील विविध विठ्ठल मंदिरे गर्दीने गजबजली . ही आषाढी नवचैतन्य घेऊन आली आहे.
परळी वैद्यनाथ- एमएनसी न्यूज नेटवर्क: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिराच्या दिशेने जाणारे रस्ते भाविकांनी फुलले होते. उशिरा का होईना पावसाचा आगमन झालं असून वातावरणात आल्हाद दायक गारवाही निर्माण झाला आहे. पंढरपुराकडे रवाना होणाऱ्या पालख्या दिंड्या ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र मार्गे पंढरपूर मध्ये पोहोचल्या आहेत,
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रभुवैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मुखी विठूनामाचा जयघोष सतत गुंजत होता. ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज मोठ्या कालावधी नंतर मंदिर परिसरात चैतन्य दिसून येतं होतें. जुन्या गावभागातील आंबेवेशीतील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे, त्याचप्रमाणे संत जगमित्र नागा मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जाजुवाडी येथील विठ्ठल मंदिर आणि परळी परिसरातील विविध विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.आज प्रभू वैद्यनाथाचे चरणी माथा टेकण्यासाठी आलेले दिसून आले. लाखो विठ्ठल भक्त आज पंढरपुरातही दाखल झाले आहेत. मोठ्या कालावधी नंतर मंदिर परिसरात आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर चैतन्य दिसून येतं होतें.
तालुक्यातील ग्रामीण व शहरातील विशेषतः महिला भाविक मोठ्या उत्साहात दर्शनासाठी आलेल्या दिसून आल्या. प्रभू वैद्यनाथ मंदिरात पहाटेपासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. भजनी मंडळी, पाच- पंचवीस व्यक्ती मिळून पताका, विना,मृदंग आदी घेऊन विठुरायाच्या नामघोष करत संत जगमित्र नागा मंदिर ते प्रभू वैद्यनाथ मंदिर या मार्गावर दिसून आले. अनेक शालेय विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत छोटी छोटी रिंगण आणि भगव्या पताका खेळताना दिसून येत होती.
शहरातील गेल्या दोन दिवसापासून भक्तिमय वातावरण दिसून येत असून अनेक छोट्या मोठ्या शाळांच्या आणि बालगोपालांच्या दिंड्या आज शहरात गल्लोगल्ली निघाल्या होत्या. गोंडस लहान मुलं मुली वारकरी वेशामध्ये आणि हाती पताका घेऊन आनंदाने बागडत दिंडीत सहभागी झाली होती. पांडुरंग आणि रुक्मिणीच्या वेशभूषेतील आपल्या बालकांकडे पाहतानाही पालक हरकून गेलेले दिसून आले. या उत्साहाने दिंडी सोहळे काढण्यामध्ये प्रामुख्याने संस्कार विद्यालय, दिल्ली पब्लिक स्कूल, विद्यावर्धिनी विद्यालय, बचपन स्कूल, पोदार विद्यालय, भगवान विद्यालय, लावण्या आई पब्लिक स्कूल, स्कॉलर केजी स्कूल आदी शाळेतील बालकांच्या दिंड्या कौतुकाचा विषय ठरल्या.
एकंदरीतच तालुक्यात विविध मंदिरात आषाढी एकादशी चे भजन, पूजन, कीर्तन, सत्संगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रत्येक मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. संत जगमित्र मंदिर आणि वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यालगत अनेक तरुण मंडळांनी भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची ची सोय केल्या दिसून येत होते.