परळी एमएनसी न्यूज नेटवर्क- शहरातील वडार कॉलनी येथील सामान्य कुटुंबातील निकिता अण्णासाहेब धोत्रे ही सैन्य दलात भरती झाल्याबद्दल परळी शहरात समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत करण्यात आले. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या वडार समाजातील मुलींनी शिक्षण घेऊन पुढे येण्याचे आवाहन याप्रसंगी निकिताने केले.
याविषयी अधिक माहिती अशी की, वडार कॉलनी येथील अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निकिता अण्णासाहेब धोत्रे ही मुलगी भारतीय सैन्य दलात बीएसएफ मध्ये भरती झाली आहे. वडार समाजामध्ये परळी तालुक्यात प्रथमच एका कन्येने सैन्य दलात भरती होण्याचा पराक्रम केला आहे.
तिच्या या सैन्य दलातील भरती झाल्याचा समाजाला तसेच आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. वडील मेकॅनिक चे काम करतात तर आई मिळेल ती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु निकिताने शिक्षण घेऊन आई-वडिलांचे पांग फेडले आहे. या निमित्ताने निकिताचे मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी नागरिकांनी पुष्पहार घालून तिचे स्वागत केले व तिला शुभेच्छा दिल्या.
वडार समाजाचा दगडफोडीचा पिढीजात व्यवसाय असल्याचे निकिताने सांगितले. समाजात विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यावे त्या नक्कीच जीवनात यशस्वी होतील अशी भावना निकिताने याप्रसंगी व्यक्त केली.
