स्वेच्छानिवृत्तीनंतर आयएएस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी पायी-पायीच गाठले घर

धडाकेबाज आयएएस अधिकारी सेवेतून निवृत्त : केंद्रेकर दाम्पत्यास शासकीय वाहनाने जावूया अशी विनंती अधिकार्‍यांनी केली , परंतु ‘वाहन नको, पायीच बरं’, साधेपणाने कर्मचारी भावूक.

छत्रपती संभाजीनगर -:  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी स्वेच्छा निवृत्ती घेतली. भारतीय प्रशासन सेवेतील धडाकेबाज आएएस अधिकारी अशी ओळख असणारे . ती सुध्दा अगदी साधेपणाने. ना निरोप समारंभ, ना हार-तुरे, ना फोटो… जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा कारभार सोपवून केंद्रेकर यांनी कोणत्याही शासकीय वाहनाचा वापर न करता सपत्नीक पायी-पायीच निवासस्थान गाठले. तेव्हा छत्रपती संभाजीनगर वासीयांनी केंद्रेकर यांना सलाम ठोकला.
आयुक्त केंद्रेकर हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. काही फाईल्सचा निपटारा केला. अभ्यागतांची निवेदने स्विकारली, अर्जसुध्दा स्विकारले. त्यानंतर दुपारी पावणे बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी पांडेय यांच्याकडे विभागीय आयुक्त पदाचा पदभार सुपूर्त केला. त्यावेळी केंद्रेकर यांच्या पत्नी सौ. धनश्री केंद्रेकर या कार्यालयात दाखल झाल्या. तेव्हा जिल्हाधिकारी पांडेय यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी केंद्रेकर दाम्पत्याचा फोटो आपल्या मोबाईच्या कॅमेर्‍यात कैद केला. केंद्रेकर हे लगेचच दालनातून बाहेर पडले. महसूल व पोलिस प्रशासनाच्या काही कर्मचार्‍यांनी पुढे येवून शेकहॅन्ड केला, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी काहींचे डोळे अक्षरशः पाणावले होते. केंद्रेकर हे सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करीत शासकीय वाहनाकडे वळण्याऐवजी पत्नीसह पायी-पायीच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर पडले.

तेव्हा जिल्हाधिकारी पांडेय, जिल्हा पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्यासह अप्पर विभागीय आयुक्त अविनाश पाठक, उपायुक्त पराग सोमन, जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारीसुध्दा त्यांच्या पाठीमागे पायीच निघाले. केंद्रेकर दाम्पत्यास शासकीय वाहनाने जावूया अशी विनंती अधिकार्‍यांनी केली खरी, परंतु ‘वाहन नको, पायीच बरं’ असे म्हणत केंद्रेकर दाम्पत्याने पायीच निवासस्थान गाठले. केंद्रेकरांसह अन्य वरिष्ठ अधिकारी रस्त्याने पायी पायी जात असल्याचे पाहून नागरीकांनी तातडीने केंद्रेकर यांना शेकहॅन्ड करीत शुभेच्छा देण्याकरीता भाऊगर्दी केली. तसेच आतापर्यंत केलेल्या कार्यास सलाम ठोकला. आम्हास तुमचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रियाही काही नागरीकांनी व्यक्त केली.