मान्सूनची महाराष्ट्रात धीमीगती, गोव्यात मात्र जुलै महिन्यातील सर्वाधिक पाऊस

स्मार्ट सिटी पणजीला पावसाचा मोठा फटका

मडगाव : राज्यात हवामान खात्याने जारी केलेल्या रेड अलर्टप्रमाणे गुरुवारीही पावसाने अक्षरशः झोडपून काढले.या पावसाने नाकेरी बेतूल येथें एक महिला महिलेचा मृत्यू झाला तर संततधार कोसळणाऱ्या  पावसामुळे ठिकठिकाणी  झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.गुरुवारी दिवसभरात राज्यात सुमारे ५.६१ इंच पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात हा एका दिवसातील सर्वाधिक पाउस आहे.

राजधानी पणजीसह राज्याच्या विविध भागांत गुरुवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. स्मार्ट सिटी पणजीला पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.  राज्यात म्हापसा, मडगाव, फोंडा याठिकाणीही अशीच परिस्थिती होती. हवामान खात्याकडील माहितीनुसार काणकोणात सर्वाधिक ७ इंच, पणजी व सांगे परिसरात ६.५० तर मडगाव व मुरगावात ६ इंच पावसाची नोंद झालेली आहे.

हवामान खात्याकडील माहितीचा आढावा घेतला असता, २८ जून रोजी १४२.५ मिमी म्हणजेच ५.६१ इंच ही एका दिवसातील सर्वाधिक जास्त पावसाची नोंद आहे. यानंतर ६ जुलै रोजी १३३.६ म्हणजेच ५.२५ इंच ही यावर्षीची एका दिवसात जास्त पावसाची दुसऱ्या क्रमांकावरील नोंद आहे. तर जुलै महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक एका दिवसातील पाऊस गुरुवारी पडलेला आहे.