वातानुकूलित रेल्वे प्रवास आता होणार स्वस्त

नवी दिल्ली : विस्टाडोम कोच असणाऱ्या वंदे भारत, अनुभूती आणि ईतर सर्व रेल्वेतील एसी चेअर कार, आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील तिकीट दर प्रवासी संख्येच्या आधारावर २५ टक्क्यापर्यंत कमी केले जाणार आहेत. रेल्वे बोर्डाने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.तिकीट दरातील सवलत रेल्वेच्या प्रतिस्पर्धी माध्यमातील दरावरदेखील अवलंबून असेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

देशभारत रेल्वे सेवांचा वाढता वापर लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मंडळाच्या मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापकांना एसी आसन व्यवस्थेच्या तिकीट दरात सवलत देण्याचे अधिकार दिले आहेत. अनुभूती आणि विस्टाडोम डब्यांसह एसी आसन असलेल्या सर्व रेल्वेच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीमध्ये ही सवलत लागू असेल. सवलत मूळ तिकीट दरावर जास्तीत जास्त २५ टक्क्यापर्यंत दिली जाऊ शकते. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट अधिभार, जी.एस.टी.सारखे अन्य शुल्क वेगळे घेतले जातील. गत ३० दिवसांत ५० टक्क्यांहून कमी प्रवासी असलेल्या श्रेणींचा तिकीट दरकपातीसाठी विचार केला जाऊ शकतो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

प्रवासी संख्येच्या आधारावर कोणत्याही श्रेणी किंवा सर्व श्रेणींत सलवत दिली जाईल, असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. तिकीट दरातील सलवत व्यवस्था तत्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर सुटी तथा सण-उत्सवादरम्यान सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेसाठी ही सलवत योजना लागू होणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.