धनंजय मुंडेंची गुरुवारी परळीत होणार प्रचंड जाहीर सभा, रेकॉर्डब्रेक गर्दी अपेक्षित

मंत्री पदी पुन्हा नियुक्तीनंतर प्रथमच बीड जिल्ह्यात होणार आगमन
कड्यापासून परळीपर्यंत होणार जोरदार स्वागत

गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे होणार नतमस्तक, परळीत पुन्हा दिवाळीची तयारी!
परळीत होणाऱ्या धनंजय मुंडेंच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष!

परळी वैद्यनाथएमएनसी न्यूज नेटवर्क- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात येत्या गुरुवारी (तारीख 13) प्रथमच येत असून या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ शहरात पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणे अपेक्षित आहे!

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी (दि. 13) रोजी सकाळी मुंबई येथून निघून दुपारी 12 वा. आष्टी तालुक्यातील कडा येथे पोचतील, कड्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर आबा चव्हाण, युव आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा) बांगर यांच्या पुढाकारातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या स्वागत-सत्काराची जोरदार तयारी केलेली पाहायला मिळत आहे.

धनंजय मुंडे यांच्या आगमनानंतर आष्टी मतदारसंघाच्या वतीने आ.बाळासाहेब काका आजबे यांच्यासह समर्थकांच्या वतीने कडा, आष्टी येथे जोरदार स्वागत करण्यात येईल, त्यानंतर धनंजय मुंडे हे त्यांचे आराध्य स्थळ असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

त्यानंतर कुसळंब मार्गे पाटोदा येथे आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजहसिंह बाळा बांगर यांनी धनंजय मुंडे यांचे पाटोदा शहरासह विविध 11 ठिकाणी भव्य स्वागत आयोजित केले आहे.
पुढे मांजरसुम्बा येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बप्पा शिंदे यांचे स्वागत झाल्यानंत बीड शहरात आगमन होईल, बीड येथे सभापती बळीराम अप्पा गवते यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य विविध स्थळी स्वागत-सत्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

बीड नंतर वडवणी येथे ही जोरदार स्वागत होईल, तसेच तेलगाव येथे ज्येष्ठ नेते आ.प्रकाश दादा सोळंके यांची सदिच्छा भेट व सत्कार घेऊन, धारूर, केज येथे बजरंग बप्पा सोनवणे व सहकार्यांच्या वतीने तर अंबाजोगाई येथे राजकिशोर पापा मोदी यांच्यासह पदाधिकारी आदींच्या वतीने स्वागत करण्यात येईल त्यानंतर धनंजय मुंडे हे परळीत दाखल होतील.
सायंकाळी 6 वा. नाथ रोडवरील यात्रा मैदानात भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहतील.

परळीत पुन्हा दिवाळी!

दरम्यान नेहमीप्रमाणे किंवा यावेळी त्यापेक्षाही अधिक उत्साहाने ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या आगमनानंतर स्वागताची व जाहीर सभेची जय्यत तयारी परळीत दिसून येत असून परळीकर आपल्या लाडक्या नेत्याच्या मंत्री पदाचा जल्लोष पुन्हा एकदा दिवाळी साजरी करून करतील, असे चित्र आहे.
शहरात ठिकठिकाणी स्वागताचे होर्डिंग्ज लागले असून जत्रा मैदानात भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. एकूणच परळी मतदारसंघासह सबंध बीड बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या आगमन व स्वागताचा उत्साह शिगेला जाताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान राज्यात निर्माण झालेली एकंदरीत राजकीय परिस्थिती, राज्यातील सत्तेत सामील होण्याचा निर्णय यानंतर प्रथमच मंत्री होऊन स्वतःच्या मतदारसंघात आल्यानंतर धनंजय मुंडे आपल्या भाषणात काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!