पणजी सत्र न्यायालयात जप्त केलेले दागिने, रोकड मध्ये फेरफार

मुख्य कारकून च्या विरुद्ध पणजी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंद.

गोवा/ पणजी :  न्यायालयातील ज्या कर्मचाऱ्याकडे विश्वासाने मुद्देमाल दिला त्या कर्मचाऱ्याने त्यात फेरफार करून न्यायालयाचा आणि सार्वजनिक सेवेचाही विश्वासघात करण्याचा प्रकार पणजीतील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात घडला आहे. या प्रकारामुळे न्यायदान देणारी यंत्रणाही हतबल झाली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) जप्त केलेले आणि उत्तर गोवा जिल्हा प्रधान न्यायालयाच्या ताब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड यांची अफरातफर केल्याप्रकरणी न्यायालयाचे मुख्य कारकून सावळाराम महाले यांच्या विरुद्ध पणजी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंद केला.

एएनसीने ९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ६.३० वाजता हणजूण येथील एका घरावर छापा टाकला होता. त्या छाप्यात प्रतीक्षा प्रशांत कोनाटकर व रोनित प्रशांत कोनाटकर या आई आणि मुलाला अटक केली होती. त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा १.७९८ ग्रॅम एमडीएमए, ०.९३६ ग्रॅम कोकेन, ५.१३५ ग्रॅम चरस असे अमली पदार्थ जप्त केले होते. याच बरोबर ९५८.६२ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३ लाख ४७० रुपये मिळून २८ लाख ३० हजार ४७० रुपयांचा ऐवजही जप्त केला होतो. सोन्याचे दागिने आणि रोकड नंतर उत्तर गोवा जिल्हा प्रधान न्यायालयाच्या ताब्यात देण्यात आली होती. १२ जानेवारी २०२० ते २० मार्च २०२३ या कालावधीत हा मुद्देमाल तिथेच होता. त्यानंतर त्यात गडबड गोंधळ दिसून आला. याअंतर्गत खात्यामार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये सावळाराम महाले यांनी अफरातफर केल्याचे प्रथमदर्शी आढळून आले. त्यामुळे न्यायालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी सिलिना परेरा यांनी पणजी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे भा.दं.सं. कलम ४०९ खाली पोलीस निरीक्षक अमीर तरल यांनी महालेंच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.