गोव्याची खासियत चमचमीत रेशाद बांगडा

गोवा-लजदार रेसिपीज खाद्य परंपरा-

गोवा आणि मासे हे समीकरण सर्वांना चांगलंच ठाऊक आहे गोव्यातील मसाल्यांच्या चवीतही इतर ठिकाणच्या मसाल्यापेक्षा वेगळेपण नक्कीच आहे. रेशाद बांगडा ही गोव्याची खासियत. पारंपरिक रितीने तयार केलेला गोव्याचा गावठी व्हिनेगर या रेशाद मसाल्यात घातल्याने त्याचा अनामिक, छानसा सुगंध मसाल्याला येतो आणि हा मसाला ताज्या बांगड्यात भरून तव्यावर भाजताना सुगंध सुटला, की शेजार्‍यापाजार्‍यांनाही समजते की, तुमच्याकडे आज जेवणात चमचमीत रेशाद बांगडा आहे! एक महत्त्वाची सूचना म्हणजे या मसाल्यात फक्त आणि फक्त काश्मिरी मिरच्याच हव्या तसेच हा रेशाद मसाला वाटताना यात अजिबात पाणी घालायचे नाही. फक्त गावठी व्हिनेगरमध्येच हा मसाला वाटायचा.

साहित्य-६ बांगडे, २ कांदे, देठ काढलेल्या ३० काश्मिरी मिरच्या, २० लहान लसूण पाकळ्या, ५ लवंगा, एक इंच आले, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, २ इंच दालचिनी, चार चमचे साखर, गावठी व्हिनेगर आणि चिमूटभर मीठ.

कृती- प्रथम काश्मिरी मिरच्यांचे दोन किंवा तीन तुकडे करून घ्यावेत. या मिरच्या आणि सर्व गरम मसाला काचेच्या भांड्यात एकत्रित करून हे सर्व भिजेल इतपत व्हिनेगर घालून थोडा वेळ मुरवत ठेवावे. दोन कांदे गॅसच्या आचेवर सालीसकट काळपट होईपर्यंत भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर वरची काळी साल काढून कांद्याचे मोठे तुकडे करावेत. हे कांदे, मुरवत ठेवलेला सर्व मसाला आणि साखर हे मिश्रण मिक्सरवर एकदम बारीक वाटावे. वाटताना गरज पडल्यास थोडा थोडा व्हिनेगर घालावा. वाटतानाच चिमूटभर मीठ टाकावे. मसाला बारीक वाटून झाल्यावर एका भांड्यात काढून घ्यावा.

बांगडे साफ करून घ्यावेत. त्यांना पाठीमागून चिर देऊन आतील काटा काढून टाकावा. बांगड्यांना थोडे मीठ चोळून घ्यावे व चिर दिलेल्या भागात रेशाद मसाल्याचे मिश्रण भरावे. उरलेला मसाला वरून बांगड्यांना लावावा. असे सर्व बांगडे तयार करून घ्यावेत. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात एकेक बांगडा अलगद घालावा. बांगड्यांना रवा किंवा कोणतेही पीठ लावू नये. चुर्र असा आवाज येईल आणि मसाल्याचा सुगंध घरभर दरवळेल. तो वास घेत गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेऊन एक बाजू छान भाजून झाली की बांगडे परतवून दुसरी बाजू छान भाजून घ्यावी. रविवारच्या जेवणाची लज्जत हा गरम गरम रेशाद बांगडा नक्कीच वाढवणार!

कविता आमोणकर