मुंबई-हावडा मालगाडीच्या डब्याचे कपलिंग तुटल्याने तासभर रेल्वे वाहतूक खोळंबली

अपघात- भंडारा/ तुमसर- राज्यातील सर्वात व्यस्त रेल्वे मालगाड्यांची वाहतूक असणाऱ्या मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड जंक्शन कडे जाणाऱ्या मुंबई-हावडा मालगाडीच्या डब्याचे कपलिंग तुटल्याने इंजिनपासून सुमारे नऊ डबे वेगळे झाले. गाडी वेगात असल्याने लोको पायलट च्या लक्षात ते आले नाही परंतु गाडीचा वेग कमी झाल्यानंतर चालकाच्या ते लक्षात न आल्याने मागील भागात असलेल्या गार्डला ही बाब लक्षात येताच वॉकीटॉकीवर इंजिनचालकांशी संपर्क साधून त्याने ही माहिती दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे मुंबई-हावडा मार्गाच्या डाऊनट्रॅकवर एक तास रेल्वे वाहतूक खोळंबली.

मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर एका दिवसभरात सुमारे 120 मालगाड्या धावत असल्याने हा लोहमार्ग अतिशय व्यस्त मानला जातो. तुमसररोड रेल्वे जंक्शनवरून डाऊन मार्गावर मालगाडी सुसाट निघाली होती. रेल्वे फाटक क्रमांक 532 जवळ कपलिंग तुटल्याने इंजिन त्याच्या मागील सुमारे दहा ते पंधरा डबे घेऊन रेल्वे इंजिन सुसाट पुढे निघाले. परंतु कपलिंग तुटल्याने मालगाडीचे नऊ डबे मागे राहिले. गाडीची गती कमी का झाली म्हणून मागे असलेल्या गार्डने कावून बघितले असता रेल्वे इंजिन मालगाडीचे काही डबे घेऊन सुसाट धावताना त्याला दिसले.

ही बाब लक्षात येताच गार्डने तात्काळ इंजिन चालकाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितल्याने चालकाने तात्काळ गाडी थांबविली. या प्रकारामुळे डाऊन मार्गावर सुमारे एक तास रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.

(प्रतीकात्मक छायाचित्र)