ना.अजितदादा पवार-धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत 15 ते 22 जुलै दरम्याम शैक्षणिक सहाय्य सप्ताहाचे आयोजन – वैजनाथ सोळंके, बाजीराव धर्माधिकारी

वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार

परळी वैद्यनाथ/एमएनसी न्यूज नेटवर्क (दि. 14) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान परळी तालुक्यात शैक्षणिक सहाय्य सप्ताहाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके व शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात अजूनही शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 15 जुलै रोजीचा धनंजय मुंडे यांचा व 22 जुलै रोजीचा अजितदादा पवार यांचा, असे दोन्हीही वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय परळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला आहे.यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहाय्य सप्ताह अंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन यासारख्या शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त पारंपरिक पद्धतीने प्रभू वैद्यनाथ अभिषेक, उमर शहावली दर्गा व हजरत शहावली दर्गा येथे चादर अर्पण हेही उपक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच संत सावता बाबा मंदिरात मुंडे साहेबांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त 49 ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाटप करण्यात येईल.परळी शहरातील अभिनव विद्यालय येथून शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाची सुरुवात होणार असून या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे तसेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून या मदतीचे वितरण करावे असे आवाहन तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड तसेच शहराध्यक्ष सय्यद सिराज यांनी केले आहे.