दूधसागर धबधबा पर्यटन बंद असल्याची पर्यटकांना माहिती नसल्याने देशभरातील येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय

पावसाळी पर्यटन-धबधबा पर्यटन बंद असल्याने परिसराची माहिती देणाऱ्या गाईडवर मोठे संकट

गोवा आणि कर्नाटक/कारवार : जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावर जाण्यास सध्या गोवा सरकारने बंदी घातली आहे.गोवा आणि कर्नाटक दोन्ही राज्यांच्या सीमेवर पश्चिम घाटातील हिरव्यागार डोंगरातून दुधासारखा फेसाळत खाली येणाऱ्या मात्र याबाबत कल्पना नसल्याने या धबधब्याचे मनमोहक रूप डोळ्यांत साठवण्यासाठी परराज्यांतून येणारे हजारो पर्यटक नाराज होऊन परतत आहेत.

बंगळुरू येथून येणारी यशवंतपूर एक्स्प्रेस ही रेल्वे पहाटे साडेतीन वाजता आणि दिल्लीहून येणारी निझामुद्दीन एक्स्प्रेस पहाटे चार वाजता दूधसागर रेल्वेस्टेशनवर येते. या दोन्ही गाड्यांतून परराज्यांतून हजारो पर्यटक दररोज या स्टेशनवर येऊन उतरतात. मात्र दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याने तेथील रेल्वे पोलीस त्यांना पिटाळून लावतात. त्यामुळे हजारो पर्यटक कुळे येथे चालत येत असून कुळे येथून संध्याकाळी रेल्वेतून आपल्या गावी परतत आहेत. दूधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातल्याचे पर्यटकांना माहिती नसल्याने परराज्यांतून येणाऱ्या हजारो पर्यटकांची गैरसोय होत आहे.

दूधसागर धबधबा पर्यटन दरवर्षी १० जूनपासून सुरू होते. यंदा मात्र अर्धा जुलै महिना संपला तरी अद्याप वन खात्याने दूधसागर धबधब्यावरील प्रवेश बंदी हटवलेली नाही. त्यामुळे या पर्यटनावर अवलंबून असलेले कुळे येथील शंभरांहून अधिक टुरिस्ट गाईड बेकार झाले आहेत. दूधसागर धबधबा प्रवेश बंदीचा फटका कुळे येथील हॉटेल व संबंधित व्यवसायांनाही बसला आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटनासाठी केव्हा खुला होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.