कृत्रिम हात आणि पाय शिबीरास मोठा प्रतिसाद, 78 दिव्यांगाना मिळणार हात व पाय

राधा मोहन साथी प्रतिष्ठान पुण्याचे काम करीत आहे-डॉ.अरूण गुट्टे

परळी वैजनाथ/एमएनसी न्यूज नेटवर्क- सर्वसाधारणपणे इश्वर प्रत्येकाला एक सारखेच स्वरूप देत असतो परंतू शारिरीक अवस्थेला छेद देणार्‍या गोष्टी अपवादाने घडत असतात. अशा व्यक्तींना आपण दिव्यांग म्हणून ओळखतो. अशा या दिव्यांग व्यक्तींना राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने साधु वासवानी मिशनच्या माध्यमातून कृत्रिम हात व पाय दिले जाणार असून हे खर्‍या अर्थाने पुण्याचे काम आहे असे मत परळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांनी व्यक्त केले.

राधा मोहन साथी प्रतिष्ठान व साधु वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने आज कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 78 जणांना 13 ऑगस्ट रोजी कृत्रिम हात व पाय बसवून दिले जाणार असून आज या सर्व दिव्यांग जणांच्या अवयवांचे मोजमाप साधु वासवानी मिशनमधील डॉक्टर मंडळींनी घेतले आहेत.
आज वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहत येथे राधा मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित कृत्रिम हात व पाय शिबीराचे उदघाटन डॉ.अरूण गुट्टे, डॉ.संतोष मुंडे, नायब तहसीलदार बी.एन.रूपनर, संपादक चंदुलाल बियाणी, सतिश बियाणी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप कराड, माजी नगरसेवक विठ्ठल दंदे, जालना येथील कृषी अधिकारी सुधाकर कराड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. या शिबीरात साधु वासवानी मिशनचे प्रोजेक्टर हेड मिलींद जाधव, डॉ.सलीम जैन, जितेंद्र राठोड, संजय जाधव, ज्ञानेश्वर पाटील सुनिल ढगे उपस्थित होत.

या शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना डॉ.अरूण गुट्टे यांनी शिबीराची एकुण कार्यक्रमाची माहिती देत अत्यंत उपयुक्त असे काम केले जात असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी चंदुलाल बियाणी यांनी केलेल्या उपक्रम आयोजनाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधा मोहन साथी प्रतिष्ठान, मराठवाडा साथी, व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन धनंजय आरबुने यांनी केले.