वेळ जाण्या आधी योग्य उपाय योजना व्हाव्यात
बीड/एमएनसी न्यूज नेटवर्क-दि. २०-
जुलै महिना संपत आला तरी जिल्हयात पुरेसा पाऊस झालेला नाही. कमी पावसामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे, जिल्हयात केवळ चौदा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे, या परिस्थितीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. वेळ जाण्या आधी योग्य त्या उपाय योजना व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी कमी पावसामुळे उशिरा पेरण्या झाल्याने मूग आणि उडदाचे क्षेत्र कमी झाले. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७८ टक्के एवढाच पाऊस झाला असून बीड जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये केवळ १४ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात अद्यापही शंभर टक्के पाऊस झालेला नाही. जुलै महिना संपत आला अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अद्यापही काही ठिकाणी पेरणा रखडल्या आहेत.
पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली चिंता
————
जिल्हयात निर्माण झालेल्या परिस्थिती विषयी पंकजाताई मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यात फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शेतकरी व नागरिकांबद्दल चिंता वाटते… वेळ जाण्या आधी योग्य उपाययोजना व्हाव्यात… जनतेच्या हिताकडे पहिले प्राधान्य अत्यावश्यक असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.