मणिपूरच्या घटनेवरून देशभरात संतापाची लाट,कठोर कारवाई ची मागणी.

(PC -The Wire)

🔸 व्हिडीओ हटवण्याचे सरकारचे समाजमाध्यमाला निर्देश 🔸 एका आरोपीला अटक,
🔸 सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरले तर आम्ही हस्तक्षेप करू, असे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले आहे.

नवी दिल्ली: मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याच्या घटनेवर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून संचारबंदी असतानाही लोक रस्त्यांवर उतरून आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन करत आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन केंद्र व राज्य सरकारने दिले आहे. दुसरीकडे मणिपूर मुद्दयावर पंतप्रधानांनी संसदेत बोलावे, अशी मागणी करत विरोधक आक्रमक झाले आहेत. सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरले तर आम्ही हस्तक्षेप करू, असे सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले आहे.

या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सांगितले. मुख्य आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

गुन्हेगारांना सोडणार नाही- नरेंद्र मोदी
मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून चिंड काढल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेमुळे १४० कोटी भारतीयांची मान शरमेने झुकली असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. तसेच दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासनदेखील त्यांनी दिले.