स्वाभिमानी अन् कणखर… विशेष लेख

स्वाभिमानी अन् कणखर,एक वलयांकित चेहरा..दमदार, कणखर आणि आश्वासक युवा नेतृत्व
———–
प्रदीप कुलकर्णी

पंकजाताई मुंडे…महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वलयांकित चेहरा..दमदार, कणखर आणि आश्वासक युवा नेतृत्व म्हणूनही आज त्यांचेकडं पाहिलं जातं. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सक्षम राजकीय वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात असताना राजकारणा सोबतच समाजकारणातही कायम आघाडीवर असलेलं हे व्यक्तीमत्व.. समाजातील वंचित, पिडित घटकांच्या सेवेसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्या मुंडे साहेबांचे अधुरे स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास घेत, येणा-या प्रत्येक संकटावर मात करत अविरतपणे वाटचाल करणारे हे धुरंधर नेतृत्व आज सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं प्रेरणास्थान बनलं आहे.

पंकजाताई मुंडे यांची राजकीय कारकीर्द सुरवातीपासून तशी संघर्षाचीच.. तरीही त्यावर स्वकर्तृत्वाने मात करत मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग त्यांनी लोकांच्या भल्यासाठीच केला. एक सरळमार्गी राजकारणी, जनतेच्या अडी- अडचणीला धावून जात त्यांच्या वेदना समजून घेण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं. महाराष्ट्रातील लाखो- करोडो कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी अन् प्रेमाची भावना आहे, हिच शक्ती त्यांना उर्जा देऊन जाते. पंकजाताई कधी कोणाचं वाईट चिंतणार नाहीत की करणार नाहीत, त्या त्रास सहन करणाऱ्या पैकी आहेत, देणाऱ्या पैकी मुळीच नाहीत, ही भावना, हा आदर आज त्यांच्याविषयी सामान्य कार्यकर्त्यां मध्ये आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची हुजरेगिरी करणे, झुकणे त्यांच्या रक्तात नाही तथापि राजकारणात वरिष्ठांचा आदर ठेवण्याचे संस्कार त्या कधी विसरल्या नाहीत.

सध्या महाराष्ट्राचं राजकारण ज्या दिशेनं जात आहे, ते सामान्य माणसाला खटकणारं आहे, अशा स्थितीत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, ही त्यांनी केलेली अपेक्षा त्यांच्यात सामान्य माणसांविषयी असलेली तळमळ दाखवून देते. सत्तेच्या काळात
मंत्री म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय असंच होतं, आपल्या खात्याच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ तर त्यांनी गोरगरिबांपर्यंत पोहोचविलाच परंतु त्याचबरोबर अनेक नव नवीन योजना अंमलात आणून लोक कल्याणाची एक अनोखी संकल्पना रूजविली.

सत्तेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवल्याने त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली, ज्यामुळं अनेकांची पोटं दुखली. कट कारस्थानांच्या राजकारणातुन त्यांची प्रतिमा हनन करण्याचा डाव पारंपारिक विरोधकांकडून रचला गेला.परंतु प्रत्येक ‘विजयात संघर्ष’ आणि प्रत्येक ‘संघर्षात विजय’ या लोकनेत्याच्या समीकरणाची शिकवण व संस्काराच्या शिदोरीवर त्यांनी इथेही विजय मिळवला. वंचित, शोषित, बहुजनांच्या हितासाठी मुंडे साहेबांचा वसा घेऊन सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास रोखण्याचा अनेक राजकीय महारथींनी निष्फळ प्रयत्न केला व आजही सुरू आहे, परंतु संघर्षाची शिकवण व जनसामान्यांचे असीम पाठबळ लाभल्याने त्यांना रोखणं कुणालाही शक्य झालं नाही. निवडणूक म्हटलं की जय-पराजय हा असतोच, पण, तरीही खचून न जाता त्यांनी जन सामान्यांचे प्रश्न अगदी तळमळीने आणि प्रामाणिकपणे सोडवण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले.

मोठया माणसांचा वारसा चालवणं हे तसं एक आव्हानच असतं, ते पेलणं सर्वानाच शक्य होत असं नाही पण पंकजाताई मात्र याला अपवाद आहेत. मुंडे साहेबांचा वारसा होणं म्हणजे त्यांच्या सत्ता, संपतीचा वारसा होणं नाही, तर त्यांच्या आदर्श विचारांचा..वंचित, पिडित, शोषित, दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा.. आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा वारसा चालवणं..जे काम पंकजाताई आपल्या राजकीय जीवनात अव्याहतपणे करत आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासताना ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही ‘ हे त्यांनी केवळ बोलून नव्हे तर आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. पद, सत्ता असो वा नसो मुंडे साहेबांचा माणसं जोडण्याचा सक्षम वारसा त्यांनी कायम जपला. आपल्या कामांतून त्यांनी वंचित, उपेक्षित घटकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजातील जातीभेद झूगारून एक माणूस म्हणून विविध घटकांना आपुलकीने जोडण्याचे काम त्या करत आहेत. सामान्य माणसासाठी अहोरात्र काम करण्याच्या स्वभावामुळे आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत लोकनेत्याचा खरा वारसा त्या आज पुढे नेत आहेत. लोकांना त्यांच्या रूपात मुंडे साहेबच दिसतात, त्यांच्यावर येणारा प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी कार्यकर्ते सदैव तयार असतात. ‘गोपीनाथ मुंडे हे नांव जगाला विसरू देणार नाही’, अशी शपथ घेणारे त्यांचे स्वाभिमानी नेतृत्व संघर्षाच्या अग्निदिव्यातून बाहेर पडून पुन्हा तितक्याच रूबाबात आणि आत्मविश्वासाने वाटचाल करेल, यात तीळमात्र शंका नाही.
••••