◾ गौतम राज्याध्यक्ष यांच्या चंदेरी आणि संदीप पाटील यांच्या षटकार आदी मासिकातून त्यांनी केलेले लेखन वाचकांना विशेष भावले.क्रिकेट आणि चित्रपट, त्यातही संगीत हा कणेकर यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.
मुंबई : लिहिण्याच्या आणि बोलण्याच्या, आपल्या खास कणेकरी शैलीने वाचकाच्या ओठावर स्मितहास्य जागवणारे आणि त्याचवेळी थेट काळजालाही हात घालणारे ‘कणेकरी’ ही आपली खास शैली लोकप्रिय करणारे ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, स्टैंडअप कॉमेडियन शिरीष कणेकर यांनी मंगळवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्याच महिन्यात ६ जून रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्र परिवाराने त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला होता.
अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सकाळीच हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेण हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील डॉ. मधुकर कणेकर रेल्वे रुग्णालयात आपली सेवा देत. त्यामुळे शिरीष कणेकर यांच्या बालपणीचा बहुतांश काळ भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालय परिसरात गेला.
कणेकर यांच्या पत्रकारितेची सुरुवात मात्र इंग्रजी माध्यमातून झाली. इंडियन एक्सप्रेस, डेली, फ्री प्रेस आणि सिंडिकेट प्रेस न्यूज एजन्सी यात त्यांनी काम केले. कणेकर मुंबई विद्यापीठाच्या कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी अनेक दैनिक, मासिके, साप्ताहिक यामध्ये सातत्यपूर्ण स्तंभ लेखन केलं. त्यांचे गाजलेली सदर म्हणजे यादो की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि मुद्दे, चहाटळकी, सूर पारंब्या, कणेकरी, लगावबत्ती, मेतकूट, फिल्म बाजी आदी नावाने केलेले स्तंभलेखन खूपच गाजले. त्यांची पुस्तके ही आली. शिरीष कणेकर यांच्या नावावरती 30 हुन अधिक पुस्तके आहेत. लगाव बत्ती या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चि.वी. जोशी पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या निधनामुळे क्रीडा, सिनेमा आणि साहित्य क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
![](https://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250123-WA0006.jpg)