आज मुंबईसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी 

संग्रहित छायाचित्र

मुसळधार पावसाचा इशारा:  मुंबई महानगरात रेड अलर्ट जारी; 

मुंबई – हवामान विभागाने मुंबई महानगराला आज रात्री 8 ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व सर्व महाविद्यालयांना गुरुवारी 27 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईकरांनी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या
सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

रत्नागिरी आणि चंद्रपूर येथे शाळांना आज सुट्टी जाहीर

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा, विद्यालयांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. यासंबधिचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.

चंद्रपूरमध्येही शाळांना सुटी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी आज 27 जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती व अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.