आरोग्य
विविध आजाराबरोबरच यकृताच्या आजारामध्ये वाढ. एनएएफएलडीचे प्रमाण जगभरातील सामान्य प्रौढ लोकसंख्येत सुमारे २५ टक्के आहे.
मुंबई: नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हा विकार एखाद्या महामारीसारखा झाला आहे. यकृताच्या आजारांचे, विशेषतः एनएएफएलडीचे प्रमाण जागतिक स्तरावर प्रचंड वाढत आहे. काही वर्षांत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा आजार बऱ्याच प्रमाणात वाढताना दिसत आहे.कॅन्सर, स्थूलत्व, मधुमेह आणि हृदयरोग विकारांसारख्या असंसर्गजन्य आजारांप्रमाणेच या आजाराचे प्रमाणही वाढत आहे. एनएएफएलडीचे प्रमाण जगभरातील सामान्य प्रौढ लोकसंख्येत सुमारे २५ टक्के आहे आणि यकृताचा सिन्हॉयसिस ४० टक्के स्थूल मुलांमध्ये हा आजार असतो, असा अंदाज बऱ्याचशा संशोधनात वर्तवण्यात आला आहे.
एनएएफएलडीच्या वाढत्या प्रमाणामुळे लिव्हर सिरॉसिस, लिव्हर कॅन्सर, रक्तशर्करा वाढणे, इन्शुलिनची कार्यक्षमता कमी होणे, रक्तातील चरबीच्या चयापचयाचे असंतुलन आणि शरीरांतर्गत प्रदाह (सबक्लिनिकल इन्फलम्मेशन) या सर्व व्याधींचे प्रमाणही वाढत आहे आणि त्यामुळे एनएएफएलडीची पॅथोफिजिओलॉजी समजून घेण्याची व प्रभावी उपचार पद्धती विकसित करण्याची गरज आहे. यासंदर्भात मधुमेहतज्ज्ञ आणि थायरॉइडतज्ज्ञ डॉ. अमित भोंडवे म्हणाले की, हेपॅटिक स्टेयाटोसिस (फॅटी लिव्हर) हा आजार कसा होतो आणि हा शरीरात कसा वाढतो आणि मधुमेहाचा यकृतावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी नुकतेच एक संशोधन करण्यात आले.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना एनएएफएलडी होण्याचे प्रमाण हे सांखितिकरीत्या अतिमहत्त्वाचे आहे यावर या संशोधनात भर देण्यात आला आहे. एनएएफएलडी आणि टाइप टू मधुमेह यांच्यातील प्राथमिक जैविक क्रियांचा अभ्यासही या अन्वेषणात करण्यात आला आहे. एनएएफएलडीच्या निदानात सुधारणा करण्यासाठी तसेच या विकाराच्या वाढीबाबत अंदाज बांधण्यासाठी प्रमुख चाचण्या आणि निदानतंत्राच्या मार्गाने मधुमेही व मधुमेहपूर्व अवस्थेतील व्यक्तींची वर्गवारी करण्याची शिफारसही या अभ्यासात करण्यात आली आहे.