प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परळी रेल्वेस्थानक नूतनीकरणाचा शुभारंभ

अमृत भारत योजनेतून देशाची संस्कृती आणि स्थानिक इतिहासाचे प्रतिबिंब दिसणार : प्रधानमंत्री मोदी
नगर-बीड-परळी रेल्वेला लवकरच परळीतून झेंडा दाखवू ; खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास
परळी | दि ०६. |एम एन सी न्यूज नेटवर्क- अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित होणारे रेल्वेस्थानक हे आधुनिक आकांक्षा आणि स्थानिक संस्कृतीचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल. या रेल्वेस्थानकांच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती आणि स्थानिक इतिहासाचे प्रतिबिंब देखील देशाला दिसणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. परळीसह देशातील पाचशे आठ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजने अंतर्गत नूतनीकरणाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
केंद्र सरकारच्या अमृत भारत योजने अंतर्गत परळी रेल्वेस्थानकाच्या चोवीस कोटी पस्तीस लक्ष रुपयांच्या नूतनीकरणाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, रेल्वेचे मुख्य अभियंता सुनील वर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राम कुलकर्णी, राजेश देशमुख, जुगलकिशोर लोहिया,दत्ता कुलकर्णी, निळकंठ चाटे, विनोद सामत,रमेश कराड,राजेश गित्ते, अच्युत गंगणे,वासुदेव नेहरकर, पवन मुंडे, शालिनी कराड, सुचिता पोखरकर, रवी कांदे यांच्यासह मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
शुभारंभ सोहळ्याला संबोधित करताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि “देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहात्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर  रेल्वेस्थानकांच नूतनीकरण होत आहे. नऊ वर्षांपूर्वी मोदींच्या नेतृत्वात केंद्रात भाजपच सरकार सत्तेत आलं आणि आपल्या भागातील विकास कामांना गती मिळाली. अमृत भारत योजनेतून आपल्या रेल्वेस्थानकाच रूप पालटणार आहे. यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून स्थानकाची इमारत प्रशस्त आणि स्वच्छ होणार आहे. प्रशस्त इमारत बांधण्याचे काम सरकारचे असले तरी आपले स्थानक स्वच्छ ठेवण्याची जवाबदारी आपली आहे, त्यामुळे आपले स्थानक आपणच स्वच्छ ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि परळी रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाने प्रवासी आणि परळीकरांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. आपल्याला इथपर्यंतच थांबायचं नाही. याच रेल्वेस्थानकातून नगर-बीड-परळी रेल्वेला आपण लवकरच हिरवा झेंडा दाखवू. जिल्ह्यात रेल्वे रस्ते पूर्ण होऊन आपला जिल्हा देशाशी जोडला जात आहे. पायाभूत सुविधा आणि उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही नऊ वर्षांपासून प्रयत्नशील आहोत, याच प्रयत्नांच्या परिपाकातून जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण झाले आहे. रेल्वेचे स्वप्न देखील दृष्टिक्षेपात आले आहे. यासर्व पायाभूत सुविधांच्या निर्माणातून जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय येतील आणि आपल्या पुढील पिढीचे भविष्य उज्वल होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.