रेणुका नगर मोहा रोड सिरसाळा येथील प्रकार
परळी /एम एन सी न्यूज नेटवर्क-:– सिरसाळा नजीक रेणुका नगर मोहा रोडलगत एका 14 वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्प केअरला मिळाली. सदरील बालविवाहाची माहिती मिळताच प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तातडीने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी यासंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात असतानाही बाल विवाहा सारखे प्रकार सुरू आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, युवा ग्राम विकास मंडळ गेल्या ११ वर्षापासून चाईल्ड लाईन (१०९८) हा प्रकल्प केंद्रीय महिला व बाल विकास यांच्या सहकाऱ्याने चालवत आहे. ० ते १८ वर्ष वयोगटातील मुला मुलींना २४ तास आपतकालीन सेवा पुरविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मौजे रेणुका नगर मोहा रोड सिरसाळा येथे बालविवाह असल्याबाबत १०९८ वरून माहिती प्राप्त होताच चाईल्ड लाईन सदस्य संतोष रेपे व प्रकाश काळे यांनी संबधित ग्रामसेवक सरपंच, अंगणवाडी सेविका, गटविकास अधिकारी, तहसिलदार आणि पोलीस स्टेशन परळी यांना फोनद्वारे संपर्क साधला व होत असलेल्या सर्व प्रकाराबद्दल माहिती दिली. हा विवाह थांबविण्यासाठी चाईल्ड लाईन सदस्य संतोष रेपे व प्रकाश काळे यांनी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक यांना माहिती दिली. ग्रामसेवक पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह थांबविण्यात आला.
—————————————————————————————–
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी जनजागरण मार्गदर्शन व शाळेमध्ये बाल विवाह प्रतिबंध प्रतिज्ञा होत असून सुद्धा काही नागरिक आपल्या मुलीचा बालविवाह करत आहेत. याची खंत आहे. आपला बीड जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत –
संतोष रेपे
युवा ग्राम अंतर्गत चाईल्ड लाईन, बीड.