पावसाळ्यामधील चिंता- लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतोय

🔷  लेप्टोस्पायरोसिसची सामान्य लक्षणे ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, उलट्या होणे आणि पोटदुखी.

🔷 आरोग्य:

मुंबई : पावसाळ्यामधील चिंताजनक बाब म्हणजे पाण्यामार्फत अनेक आजार पसरतात आणि वेळेवर त्यांचे निदान व उपचार करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे. रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून किंवा घाणीतून फिरल्याने लेप्टोस्पायरोसिसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पावसातून किंवा इतर ठिकाणाहून अनवाणी किंवा पाई जाऊन आल्यावर आपले हात पाय स्वच्छ धुणे अतिशय आवश्यक आहे.पावसाळ्यामध्ये पाणी साचणे टाळता येऊ शकत नाही, तसेच सांडपाण्यामधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याच्या संपर्कात येण्याची शक्यतादेखील असते. यामुळे पावसाळ्यादरम्यान सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये लेप्टोस्पायरोसिससारख्या आजाराने सर्वत्र डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे.

सेंटर फॉर डीसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेन्शन (सीडीसी) यांच्या मते, लेप्टोस्पायरोसिस हा माती, पाणी व वनस्पती दूषित करणारे प्राण्यांचे मूत्र आणि विष्ठेद्वारे प्रसारित होणारा जीवाणूजन्य संसर्ग आहे. या संसर्गासाठी कारणीभूत जीवाणूला लेप्टोस्पायरा म्हणतात. उंदीर, कुत्रे, घोडे, डुक्कर किंवा गायी या प्राण्यांमार्फत (एकतर भटक्या किंवा घरगुती) संसर्ग पसरू शकतो. लेप्टोस्पायराची लागण झालेल्या प्राण्यांमुळे पाणी किंवा माती दूषित होते, ज्यामुळे जीवाणू इतर प्राण्यांमध्ये किंवा मानवांमध्ये पसरतात. लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव सहसा सांडपाण्यासारख्या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने होतो.

पावसाळ्यात या प्रादुर्भावाची शक्यता वाढते, कारण ड्रेनेज लाइन गळतीमुळे रस्त्यावर पाणी साचते, परिणामतः आजार होण्याचा धोका वाढतो. आजाराचा उद्भावन कालावधी साधारणतः ५ ते १४ दिवसांचा असतो, जो २ ते ३० दिवसांचादेखील असू शकतो. लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे व्यक्तीनुसार भिन्न असू शकतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या अॅण्टीबायोटिक्ससह त्वरित उपचार केल्याने या लक्षणांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते. पण सीडीसी लक्षणांचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याचा सल्ला देते आणि त्यावर उपचार न केल्यास अंतर्गत रक्तस्राव व अवयव निकामी होऊ शकतात.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे. रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून किंवा घाणीतून फिरल्याने लेप्टोस्पायरोसिसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.