रुग्णालयातील उंदराचा त्रास संपवण्यासाठी रॅट किलिंग मशीन चा वापर

🔷 अल्ट्रासोनिक वेव मशीन प्रथम केईएम रुग्णालयात बसवणार.

मुंबई : मुंबईत सध्या उंदरांनी धुडगूस घातला आहे. गल्लीबोळापासून रहिवाशी संकुलांबरोबच रुग्णालयातही उंदरांची संख्या वाढलेली दिसते. प्रशासनाचे प्रयत्न त्यामुळे वॉर्डमधील उंदीर मारण्यात येत असले, तरी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून फेकल्या जाणाऱ्या अन्नावर हे उंदीर ताव मारत आहेत. त्यामुळे आता पालिका रुग्णालयांमध्ये रॅट किलिंग मशीन बसवली जाणार आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयापासून सुरुवात होणार आहे. या मशीनमुळे केवळ उंदीर पळणार नसून उंदरांचा खात्मादेखील होणार आहे.केईएम रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर या मशीन, ऑपरेशन थिएटर, कॅथलॅब आणि शवागृह या तीन ठिकाणी ही मशीन बसवली जाणार आहेत. ही मशीन अल्ट्रा सोनिक वेव असल्याने
केवळ उंदरांनाच या मशीनचा त्रास होणार आहे

महापालिके च्या रुग्णालयात मुंबई शहर व राज्यभरातून रुग्ण येतात. यासोबत रुग्णालयातील स्वच्छतेवर रुग्णालय प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाते. मात्र सध्या मुंबईतील वाढणाऱ्या उंदरांचा फटका रुग्णालयांनादेखील बसू लागला आहे. पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात उंदरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उंदरांची संख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाय योजना आखली आहे.

रुग्णलय परिसरात नातेवाईकानीं खाल्ल्यानंतर उरलेले अन्नपदार्थ तेथेच टाकतात. या अन्नपदार्थांमुळे उंदीर, मांजरी आणि कुत्र्यांचे पालिका रुग्णालयात साम्राज्य निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, कीटकनाशक विभागातर्फे आता सर्व रुग्णालयांमधून उंदरांचा नायनाट केला जात आहे. मशीन देणाऱ्या कंपनीसोबत बोलणे सुरू असून तीन ठिकाणी, किती मशीन बसवल्या जातील आणि त्याला किती खर्च येईल, यावर चर्चा सुरू असून निविदा प्रक्रियेनंतर पुढील कार्यवाही सुरू होईल असे डॉ. रावत यांनी सांगितले.

मशीन नेमके काम कशी करते-अल्ट्रासोनिक मशीनमधून येणारा आवाज हा फक्त उंदरांनाच ऐकू येतो. मशीनमधून निघणारा ध्वनी बंद खोलीत घुमतो. तो ऐकल्यानंतर उंदीर पळून जातात आणि जास्त वेळ ऐकल्यावर त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होऊन त्यांचा जीव जातो. ही मशीन बंदिस्त ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते.