१७ ऑगस्ट रोजी आंदोलन, पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याचा होणार निषेध.
बीड/एम एन सी न्यूज नेटवर्क- पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने त्या निषेधार्थ बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दि.17ऑगस्ट रोजी सकाळी11वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच तालुका स्तरावर शहराच्या मुख्य चौकात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निदर्शने केली जाणार आहेत.
याबाबतचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे सोशल मिडीया प्रमूख आनिल वाघमारे विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य अनिल महाजन विभागीय संघटक सुभाष चौरे, बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल साळुंके, पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे , कार्याध्यक्ष सतीश बियाणी , कोषाध्यक्ष छगन मुळे,उपाध्यक्ष रवि उबाळे, प्रसिध्दीप्रमुख संजय हांगे, परिषद प्रतिनिधी विलास डोळसे, हल्ला विरोधी कृती समितीचे निमंञक दत्ताञय अंबेकर,समन्वयक अभिमन्यू घरत ,डिजीटल मिडीया पत्रकार परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र सिरसट, यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड करण्यात आला. या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेची तात्काळ बैठक होवून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पाचोर्यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटना एकत्र आल्या 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करण्याचे ठरले. पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तालुका पत्रकार संघानी त्या त्या शहराच्या मुख्य चौकात दिनांक 17 रोजी दुपारी 11वाजता पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करावी. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.