सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत केलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय-एस.एम.देशमुख
मुंबई/एम एन सी न्यूज नेटवर्क- महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले आणि सरकारच्या बघ्याच्या भूमिकेची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने स्वत:हून(स्यू-मोटो अॅक्शन) दखल घेतली असून पाचोरा पत्रकार हल्ला प्रकरणी पीसीआयने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.या प्रकरणी प्रेस कौन्सिलने राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे.. प्रेस कौन्सिलने एक सत्य शोधन समिती देखील स्थापन केली आहे.ही समिती पाचोरयाला जाऊन सर्व वस्तुस्थितीची माहिती करून घेईल अशी अपेक्षा आहे.सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत केलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
10 ऑगस्ट रोजी पाचोरा येथील पत्रकार #संदीप_महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी हल्ला केला होता.त्यानंतर मुंबईतील तेरा पत्रकार संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.17 ऑगस्ट रोजी याचा निषेध करण्यासाठी राज्यभर पत्रकारांनी निदर्शनं करीत पत्रकार संरक्षण कायदयाची होळी केली. महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींची , प्रेस कौन्सिलने स्वतःहून दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस पाठविली आहे..राज्य सरकारला ही मोठी चपराक असल्याचे सांगितले जाते.
प्रेस कौन्सिलची बैठक सोमवारी दिल्लीत होत आहे.या बैठकीत महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा आपण उपस्थित करणार असल्याचे कौन्सिलचे महाराष्ट्रातील सदस्य पराग करंदीकर यांनी सांगितले. आज एस.एम.देशमुख यांनी पराग करंदीकर यांना महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल लक्ष घालण्याची विनंती केली होती.