रेल्वे तिकिट काळाबाजार, सावंतवाडीत एकास अटक

मडगाव रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाची संयुक्त कारवाई ,एकास अटक :  २५ हजारांची ई तिकिटे जप्त.

रेल्वे तिकिट काळाबाजार-

गोवा/मडगाव- सिंधुदुर्ग/सावंतवाडी : एकाच आयडीवरून अनेक तिकिटांचे बुकिंग केल्याचे स्पष्ट झाल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी मडगाव रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने संयुक्त कारवाईत सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथील एका आस्थापनावर छापा टाकला. २५ हजारांची ई तिकिटे जप्त करून अक्षय देशपांडे (३०) याला अटक केली. तब्बल १४० फेक आयडींसह तो हा कारनामा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एकाच आयडीवरून अनेक तिकिटांचे बुकिंग केल्याचे स्पष्ट झाल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत संशयित अक्षय देशपांडे याला अटक केली. सावंतवाडी येथील अक्षय इंटरप्रायझेस या आस्थापनातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार सिंधुदुर्गातील रेल्वे पोलिसांसह मडगाव रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून या आस्थापनावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात आयआरसीटीसीचे १४० वैयक्तिक युजर आयडी, अवैध सॉफ्टवेअर, एक कॉम्प्युटर, एक लॅपटॉप, दोन मोबाईल, डेबिट कार्ड, २५ हजार रुपयांची रेल्वेची २० ई तिकिटे जप्त करण्यात आली.

यानंतर संशयित अक्षय देशपांडे याला अटक करण्यात आली. संशयिताला कणकवली येथील न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.