बसचे टायर हातावरून गेल्याने हात निकामी

बीड/अंबाजोगाई – एमएनसी न्यूज नेटवर्क- अंबाजोगाई बसस्थानका समोरच उदगीरहून छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी उदगीर आगाराची बस बसस्थानकामध्ये जात असताना रस्त्याने पायीचालत असलेल्या पादचाऱ्याने अचानक बस समोर उडी मारली. चालकाच्या प्रसंगाधवनामुळे पादचाऱ्याच्या हातावरून टायर गेल्याने हात निकामी झाला.सदर घटना दुपारी दोनच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकासमोर घडली.

अंबाजोगाई बस स्थानका मध्ये उदगीर- छत्रपती संभाजीनगर बस क्रमांक (एम.एच.20. बी.एल.3824) छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. अंबाजोगाईच्या बसस्थानकामध्ये वळत असताना धुराजी बालाजी साळवे, रा. अंबाजोगाई (वय 29) याने बससमोर उडी मारली. बस चालकाच्या हे लक्षात आल्याने त्याने ब्रेक मारला परंतु डाव्या बाजूचे टायर त्याच्या हातावरून गेल्यामुळे हाताचा तुकडा पडला. चालकाच्या प्रसंगधावनामुळे त्याच्या अंगावरून गाडी जाण्याची घटना टळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई आगाराच्या वतीने व शहर पोलिसांच्या वतीने पंचनामा करून जखमीला स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.