पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी जयंती व बंसल क्लासेसचा द्वितीय वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी जयंती व बंसल क्लासेसचा द्वितीय वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

छत्रपती संभाजीनगर/एमएनसी न्यूज नेटवर्क- – पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांची जयंती व बंसल क्लासेसचा द्वितीय वर्धापन दिन शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. बंसल क्लासेसच्या मुख्य कार्यालयात स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बंसल क्लासेसच्या वतीने विद्यार्थी हिताच्या विविध उपक्रमांच्या घोषणा करण्यात आल्या. ज्यामध्ये बूस्ट ही शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परिक्षा, स्कॉलरशिप मॉक टेस्ट सिरिज यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी यांच्या कार्यकुशल व्यक्तिमत्वाने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. कोटा, राजस्थान येथील सुविख्यात बंसल क्लासेसची शैक्षणिक सेवा महाराष्ट्रात आणण्याचे महत्वाकांक्षी कार्य त्यांनी पार पाडले. गेल्या २ वर्षात बंसल क्लासेसने राज्यातील विविध ४० शाखांच्या माध्यमातून नीट व जेईई परीक्षेत यशस्वी निकाल प्रदान केले. लवकरच राज्यात सर्वत्र एकत्रित शंभरहून अधिक ठिकाणी बंसल क्लासेसच्या शाखा सुरू करण्याचा संकल्प मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी यांनी यानिमित्ताने केला.

या कार्यक्रमाला बियाणी उद्योग समुहाचे संचालक तथा मराठवाडा साथीचे संपादक जगदीश बियाणी हे सुध्दा उपस्थित होते. याप्रसंगी, स्व.मोहनलालजी बियाणी अर्थात काकाजी यांच्या आठवणींना उजाळा देतांना, काकाजींनी शिक्षकी पेशातून सुरू केलेला प्रवास, अनेक चढ उतार आणि खडतर प्रसंगातून आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या, सचोटी आणि प्रामाणिक कष्टांच्या बळावर कसा पुढे नेला आणि बियाणी उद्योगातील विविध उपक्रमांची कशी पेरणी व संगोपन केले हे सांगितले. काकाजींनी लावलेल्या रोपट्याचा आज विशाल कल्पवृक्ष बहरला आहे. काकाजींनी आम्हा सर्व मुलांना दिलेली सकारात्मक शिकवण आणि संस्कार या शिदोरीवर आम्ही महाराष्ट्रासोबतच आज बाहेर राज्यात देखील बियाणी उद्योगसमूहाचा यशस्वी विस्तार करत आहोत, असे प्रतिपादन जगदीश बियाणींनी केले.

यावेळी प्रास्ताविकात बोलत असताना, बंसल क्लासेसचे स्टेट हेड प्रा.विष्णू घुगे यांनी काकाजींना अभिवादन करून, बंसल क्लासेसने आज जाहीर केलेल्या बूस्ट परीक्षे विषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील दहाव्या वर्गात शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मोफत असलेल्या या परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोट्यावधीची शिष्यवृत्ती आणि सोबतच लाखोंची बक्षिसे मिळवण्याची संधी प्राप्त होणार असल्याची त्यांनी सांगितले. डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा व स्कॉलरशिप मॉक टेस्ट सिरिजची याबाबत देखील त्यांनी माहिती दिली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवू इच्छिणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी जागतिक दर्जाच्या फिनलँड एज्युकेशन पद्धतीवर आधारित क्युरिअस किड्स प्लेएज्यूकेशन सेंटरच्या फ्रेंचाइजी देणे असल्याची घोषणा सुध्दा घुगे यांनी केली.

बंसल क्लासेसच्या सर्व ४० शाखांमधून वर्धापनदिन तथा जयंतीउत्सव साजरा

राज्यात सर्वदूर पसरलेल्या बंसल क्लासेसच्या सर्व शाखांमधून आज पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या जयंती व द्वितीय वर्धापन दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आगामी काळात विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार शैक्षणिक सेवा आणि संस्कार देण्याचा संकल्प यानिमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांनी केला. पुढील सर्व परिक्षात बंसलच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी निकाल हिच स्व. काकाजींना खरी आदरांजली ठरेल अशी भावना सर्व शाखा व्यवस्थापकांनी याप्रसंगी व्यक्त केली.