लाचखोरी
सोलापूर/पंढरपूर: शेत जमिनीची खरेदी परवानगीचा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदाराने 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच एका खाजगी इसमास देण्यास सांगितले. ती पंधरा हजाराची लाच घेणाऱ्या दोन खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्या नायब तहसीलदार विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
नायब तहसीलदार आप्पासाहेब शिवाजी तोंडसे (वय ५६ वर्षे, ), खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम (वय ५९, पंढरपूर) व खाजगी इसम सचिन विठ्ठल बुरांडे (वय ४६ वर्षे, रा. विट्ठलनगर, गौतम विद्यालय शेजारी पंढरपूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या शेजारील १० गुंठे शेतजमीन खरेदी केली असून, सदर शेत जमीन ही १० गुंठे असल्याने सदरच्या खरेदी करीता उपविभागीय अधिकारी, उपविभाग पंढरपूर यांची परवानगी आवश्यक असते. सदर परवानगी मिळणेकरीता यातील तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभाग पंढरपूर येथे प्रस्ताव सादर केला. सदरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेकडून मंजुर करुन घेवून शेतजमीन खरेदीची परवानगी देण्याकरीता यातील लोकसेवक आप्पासाहेब शिवाजी तोंडसे, पद- नायब तहसिलदार याने तक्रारदार यांच्याकडे २०,००० रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १५,००० रुपये लाच रक्कम खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम यांचेकडे देण्यास सांगीतली.
सदर लाचेची रक्कम तुकाराम बाळकृष्ण कदम यांनी स्वीकारून ती सचिन विट्ठल बुरांडे, यांचेकडे दिली असता सचिन बुरांडे यांनी सदरची लाच रक्कम स्वीकारली. लाच घेताना वर नमूद आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई पोनी. उमाकांत महाडिक, पोह. शिरीषकुमार सोनवणे, पोना. अतुल घाडगे, पोकों. सलिम मुल्ला, पोह राहुल गायकवाड, सर्व एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.