कार्यकर्त्यांप्रती संवेदनशील राज ठाकरे आजारी मुलाला भेटायला दापोडीत त्याच्या घरी

मुलाची राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा

पुणे/ पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी कार्यकर्त्यांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे पहायला मिळते. तसा अनुभव देखील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मनसेची स्थापना झाल्यापासून अनेक मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांनी बांधून ठेवलेले आहेत. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या माणुसकीचा प्रत्यय आला. पिंपरी परिसरातील दापोडी परिसरात राहणारा मनसेचा रिक्षा चालक असलेला कार्यकर्ते विजय देशपांडे यांच्या मुलाला ‘मस्क्युलर डायस्ट्रॉपी’ या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्या मुलाचे नाव देखील ‘राज’आहे. या मुलाचा राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. या छोट्या मनसैनिकाचा हट्ट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पूर्ण केला. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या दापोडी येथील घरी जाऊन त्यांच्या मुलाची भेट घेतली.

दापोडीत वास्तव्यास असलेले विशाल देशपांडे हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या अगोदरपासून ते राज ठाकरे यांचे समर्थक आहेत. कंपनीतील नोकरीनंतर ते आता रिक्षा चालवतात. देशपांडे यांना राज नावाचा मुलगा आहे. तीन महिन्यांपूर्वी या मुलाला “मस्क्युलर डायस्ट्रॉपी” या आजाराचे निदान झाले. मुलाची राज ठाकरे यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. राज ठाकरे यांनी या मुलासाठी स्वत: खरेदी करुन त्याच्यासाठी खेळणी, खाऊ आणला. त्याला गिफ्ट देखील दिले. त्यानंतर राज याने राज ठाकरे यांना देखील गिफ्ट म्हणून पेन दिला.
सोमवारी ठाकरे यांना याबाबत माहिती दिली होती. राज ठाकरे यांनी बुधवारी  थेट देशपांडे यांच्या घरी जाऊन त्याच्यासोबत १५ ते २० मिनिटे गप्पा मारल्या. मुलाने पांढरा झब्बा घातला होता. त्याच्यावर राज ठाकरे यांनी “प्रिय राज” असे लिहित स्वाक्षरी देखील केली. ठाकरे यांनी घरी भेट देत इच्छा पूर्ण केल्याने देशपांडे कुटुंबीयांना आनंद झाला.

फोटो क्रेडिट -रमेश मोरे