कृषी मंत्री परळीचे असुनही मंडळावरच अन्याय का – काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई
परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तालुक्यात 25 % अग्रीम पीकविमा देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यातुन परळी मंडळ वगळले आहे. कृषी मंत्री परळीचे आहेत म्हणून हे मंडळ वगळले की काय असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केला असुन हा अन्याय तातडीने दूर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान दुष्काळी अनुदान आणि 2020 च्या पिकवीम्याचे त्वरीत वितरण करावे अशीही मागणी केली आहे.
पावसाळा अर्ध्यापेक्षा जास्त संपला तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ही परिस्थिती लक्षात घेऊन बीड जिल्ह्यासह परळी वैजनाथ तालुक्यातील मंडळामध्ये 25 % अग्रीम पीकविमा देण्याची घोषणा केली आहे. मात्र यात परळी वैजनाथ हे मंडळ वगळण्यात आले आहे. त्यामुळे परळी मंडळातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. परळी मंडळातही गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस झालेला नाही. असे असताना परळी मंडळ का वगळले असा सवाल बहादुरभाई यांनी केला आहे.
पाऊस नसल्याने सर्वच शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. त्यामुळे अग्रीम पीक विमा देताना वगळण्यात आलेल्या परळी मंडळलाही अग्रीम पीक विमा मंजूर करावा अशी मागणी बहादुरभाई यांनी केली आहे. दरम्यान दुष्काळी अनुदान आणि 2020 च्या पिकवीम्याचे त्वरीत वितरण करून बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.