538 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात..जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक

ED ची कारवाई, कॅनरा बँकेने तक्रार केली होती. पूर्वी दोनदा ईडीने बोलावल्यानंतर ते हजर झाले नव्हते. एकेकाळी जेटकडे एकूण 120 विमाने होती तेव्हा ती दररोज 650 उड्डाणे चालवत होती.

नवी दिल्ली- (वृत्तसंस्था) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडचे संस्थापक नरेश गोयल यांना बँक फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. त्यांच्यावर 538 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ७४ वर्षीय गोयल यांना आज (२ सप्टेंबर) विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे. ईडी त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे.गोयल यांना शुक्रवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये (पीएमएलए) अटक करण्यात आली.नरेश गोयल यांच्याविरोधात कॅनरा बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की त्यांनी 848.86 कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केले होते, त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकित होते.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या वर्षी मे महिन्यात नोंदवलेल्या एफआयआरवर हे प्रकरण आधारित आहे. नरेश गोयल यांची पत्नी अनिता, जेट एअरवेज एअरलाइन्सचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी आणि अन्य काही जण या प्रकरणात आरोपी आहेत. सीबीआयने ५ मे रोजी गोयल यांच्या मुंबईतील कार्यालयासह ७ ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईत नरेश गोयल, अनिता गोयल आणि गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीने १९ जुलै रोजी गोयल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने गोयल आणि त्यांच्या साथीदारांच्या ठिकाणांवर छापे टाकून शोध घेतला.

जेट एअरवेज (इंडिया) वादात अडकल्यानंतर अनेक एजन्सी जेट एअरवेजच्या कारभाराची चौकशी करत आहेत. यामध्ये ईडी, सीबीआय, आयकर आणि एसएफआयओ यांचा समावेश आहे.

जेट एअरवेज एप्रिल 2019 पासून बंद आहे. जेट एअरवेज ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानसेवा होती आणि दक्षिण आशियाई राष्ट्रातील सर्वात मोठ्या खाजगी विमान कंपनीचा दर्जा होता. 17 एप्रिल 2019 रोजी कर्जाच्या ओझ्यामुळे जेट एअरवेज  बंद करण्यात आली.एकेकाळी जेटकडे एकूण 120 विमाने होती तेव्हा ती दररोज 650 उड्डाणे चालवत होती. जेव्हा कंपनी बंद झाली तेव्हा तिच्याकडे फक्त 16 विमाने उरली होती. मार्च 2019 पर्यंत कंपनीचा तोटा 5,535.75 कोटी रुपयांवर पोहोचला होता.1990 च्या दशकाच्या सुरुवातीस, तिकीट एजंट- उद्योजक बनलेले नरेश गोयल यांनी जेट एअरवेज सुरू केली आणि लोकांना एअर इंडियाचा पर्याय दिला.