गोवा पोलिस (एएनसी) कारवाई : ५० लाखांचे अमलीपदार्थ जप्त, इटालियन डीजे बबलहेडला अटक

गोवा/पणजी : देशभरातील किंबहुना जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचे देशातील आवडीचे राज्य म्हणजे गोवा. सुंदर,स्वच्छ समुद्रकिनारे, वनराई उत्साहवर्धक वातावरण यामुळे गोवा सर्वांनाच आवडीचा आहे. मात्र गेले काही वर्षापासून गोव्यात अमली पदार्थ विक्रीचा सुळसुळाट होतो आहे. उच्चभ्रू आणि अधिक पैसा खर्च करणाऱ्या काही जणांसाठी गोवा पर्वणी ठरत आहे. यात प्रामुख्याने  जुगार (गॅम्बलिंग) मद्यपान आणि नशाखोरांची संख्या वाढते आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग विक्रीचे रॅकेट असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. नुकताच गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी मोठी कारवाई करत सुमारे 50 लाखाचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात इटालियन डीजे बबल हेडला अटक करण्यात आली आहे.

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) रविवारी पहाटे आसगाव येथे छापा टाकून त्यांच्याकडून ५०.२५ लाखांचे ५० ग्रॅम एलएसडी लिक्विड आणि ५० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले.

एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, छिवार-हणजूण-आसगाव भागात राहणारा डीजे स्टेफेनोनी याचा अमली पदार्थ तस्करीत सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पोलीस अधीक्षक बाॅसिएट सिल्वा आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, हवालदार उमेश देसाई, प्रमोद कळंगुटकर, कॉन्स्टेबल नीतेश मुळगावकर, साईराज नाईक, सुमीत मुठकेकर, मंदार नाईक, मकरंद घाडी, योगेश मडगावकर, अनंत राऊत व इतर या पथकाने शनिवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० यावेळेत आसगाव परिसरात एका घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी प्रसिद्ध इटालियन डीजे स्टेफेनोनी उर्फ डीजे बबलहेड आणि नेल वॉल्टर यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ५०.२५ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम एलएसडी लिक्विड आणि ५० ग्रॅम चरस मिळाले. उपनिरीक्षक दीनदयाळनाथ रेडकर यांनी अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २०(बी)(ii)(बी) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक त्यांना केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.